राज्य उत्पादन शुल्कचा महसूल घटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 11:53 PM2017-11-22T23:53:11+5:302017-11-22T23:53:25+5:30
ग्रामीण भागात २२० मीटरच्या आत बिअर बार, देशी दारु वाईन शॉपची दुकाने चालविण्यास बंदी घातल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाचा महसूल मोठ्या प्रमाणात घटल्याचे समोर आले आहे. नागपूर खंडपीठाच्या २९ नोव्हेंबर रोजीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ग्रामीण भागातील दुकाने सुरु करण्यासाठी विक्रेते वरिष्ट स्तरापर्यंत प्रयत्न करीत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : ग्रामीण भागात २२० मीटरच्या आत बिअर बार, देशी दारु वाईन शॉपची दुकाने चालविण्यास बंदी घातल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाचा महसूल मोठ्या प्रमाणात घटल्याचे समोर आले आहे. नागपूर खंडपीठाच्या २९ नोव्हेंबर रोजीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ग्रामीण भागातील दुकाने सुरु करण्यासाठी विक्रेते वरिष्ट स्तरापर्यंत प्रयत्न करीत आहेत.
हिंगोली जिल्ह्यात एकूण १७४ दुकांनाना मंजुरी आहे. यामध्ये बिअर बार ७५, देशी ४०, बिअर शॉपी ६५, वाईन शॉप ४ एवढी दुकानांची संख्या आहे. यावरच शासनाला सर्वाधिक जास्त महसूल मिळतो. मात्र ग्रामीण भागात महामार्गापासून २२० मीटरच्या आत दुकाने चालविण्यावर बंदी असल्याने मोठ्या प्रमाणात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या महसुलात घट होत आहे. सद्यस्थितीत बिअर बार ४४, वाईन शॉप ४, बिअर शॉपी २५, देशी ३६ अशी एकूण १२९ दुकाने सुरु आहेत. ग्रामीण भागातील महामार्गाजवळील दुकाने सुरु करण्याचा कोर्टाचा निकाल लागलेला नाही. ग्रामीण भागातील दुकाने सुरु करण्याच्या मागणीसाठी परवानाधारक दारुविक्रीच्या व्यवसायिक युनियनच्या वतीने वरिष्टापर्यंत प्रयत्न केले जात आहेत. मात्र अजून तरी त्याला यश आलेले नसल्याने महसुलमध्ये मोठ्या प्रमाणात घट होत आहे. दुय्यम निबंधक कार्यालय, दारु विक्री, (एक्साईज) महसूल विभाग, उपप्रादेशिक परिवहन, ‘सेल टॅक्स’ ही कार्यालयाले टॉप- ५ म्हणून ओळखली जातात. या विभागाकडून शासनाला सर्वाधिक जास्त महसूल मिळतो. मात्र २२० मीटरच्या आतील दुकानावर बंदी घातल्याने महसूल गोळा होत नसल्याचे समोर आले आहे. तसेच ग्रामीण भागात दारुविक्रीच होत नसल्याने ग्रामीण भागातील तळीराम शहरी ठिकाणी दारु पिण्यास येत आहेत. तर ये- जाचे तिकिट निघावे म्हणून दारुच्या बाटल्या सोबत नेत आहेत.
अशा परिस्थितीत पार्सल घेऊन जाणारी व्यक्ती कधी पोलिसांच्या तावडीत सापडलीच तर त्याचा केस पेपर बनविला जात आहे.