जालना रेल्वेस्थानकावरील मालवाहतूक बंद
By Admin | Published: June 11, 2014 12:18 AM2014-06-11T00:18:07+5:302014-06-11T00:34:27+5:30
जालना - माल उतरविण्यास नऊ तासांपेक्षा अधिक विलंब झाल्यास लागणाऱ्या डेमरेज (दंड) चे दर रेल्वे प्रशासनाने दुपटीने वाढविल्याने व्यापाऱ्यांनी रेल्वेद्वारे मालवाहतूक बंद केली आहे.
जालना - रेल्वे वॅगनमधून माल उतरविण्यास नऊ तासांपेक्षा अधिक विलंब झाल्यास लागणाऱ्या डेमरेज (दंड) चे दर रेल्वे प्रशासनाने दुपटीने वाढविल्याने दोन दिवसांपासून व्यापाऱ्यांनी रेल्वेद्वारे मालवाहतूक बंद केली आहे. त्याचा फटका हमाल-मापाडींनाही बसला असून त्यांची उपासमार होत आहे.
रेल्वे प्रशासनाने डेमरेजचे दर दुप्पट केल्याने व्यापाऱ्यांनी दोन दिवसांपासून रेल्वे वॅगनद्वारे मालाची ने-आण करणे बंद केले आहे. त्यामुळे जालना मालधक्क्यावर दोन दिवसांपासून कोणतीही मालवाहतूक करणारी रेल्वे आली नाही. रेल्वे वॅगनद्वारे आलेला माल मालधक्क्यावर उतरविण्यासाठी संबंधित व्यापाऱ्यांना ४ तासांची वेळ मर्यादा दिली जाते. ४ तासांपेक्षा अधिक वेळ लागल्यास डेमरेज द्यावा लागतो. यापूर्वी डेमरेज प्रतिवॅगन प्रतितास १५० रुपये आकारले जात होते. मात्र काही दिवसांपासून रेल्वे प्रशासनाने डेमरेजच्या दरांमध्ये दुपटीने वाढ केली आहे. त्यामुळे आता ४ तासांपेक्षा अधिक वेळ लागल्यास ३०० रुपये प्रतितास इतका डेमरेज आकारला जातो. डेमरेजचे दर वाढविल्यामुळे काही व्यापाऱ्यांकडून विरोध होत आहे. या विरोधामुळे संबंधित व्यापाऱ्यांनी मालाची ने-आण करणे बंद केले आहे. परिणामी, दोन दिवसांत एकही मालगाडी मालधक्क्यावर आली नाही.
या मालधक्क्यावर १५० हमाल रोजंदारी करतात. मात्र मालवाहतूक बंद झाल्याने दोन दिवसांपासून त्यांची उपासमार सुरू आहे. त्याचप्रमाणे ६० ट्रकचालकांचेही काम बंद झाले आहे. त्यामुळे ट्रक या धक्क्यासमोरच उभ्या आहेत. ही मालवाहतूक केव्हा सुरू होईल, हे निश्चित नसल्याचेही सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
रेल्वे प्रशासनाकडून मात्र इन्कार
मालधक्क्यावरील काही हमालांशी संपर्क साधला असता तीन-चार दिवसांपासून मालवाहतूक बंद असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे आमची उपासमार होत असल्याचेही ते म्हणाले.
स्थानिक रेल्वे प्रशासनाने मालवाहतूक बंद असल्याबद्दल इन्कार केला आहे. स्थानकप्रमुख विजयसिंग वळवी म्हणाले की, मालवाहतूक नेहमीप्रमाणे सुरू आहे. ती बंद नाही, असा दावा त्यांनी केला.
गव्हाचा माल येणार
रेल्वे अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मालधक्क्यावर मालाची ने-आण करण्याचे काम बंद झालेले नाही. तीन दिवसांपूर्वी येथे खताचा माल उतरविण्यात आला होता. आज रात्री उशिरा किंवा उद्यापर्यंत गव्हाचा माल जालना रेल्वेस्थानकावर पोहोचणार आहे.