चरसची तस्करी करणाऱ्याची दहा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा कायम
By Admin | Published: March 15, 2016 12:37 AM2016-03-15T00:37:36+5:302016-03-15T00:37:36+5:30
औरंगाबाद : चरसची तस्करी केल्याच्या आरोपाखाली विशेष सत्र न्यायाधीश (एनडीपीएस) एस. जी. शेटे यांनी अहमद मोईउद्दीन ऊर्फ
औरंगाबाद : चरसची तस्करी केल्याच्या आरोपाखाली विशेष सत्र न्यायाधीश (एनडीपीएस) एस. जी. शेटे यांनी अहमद मोईउद्दीन ऊर्फ महंमद अक्रम महंमद इकबाल यास दोषी धरून दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा आणि एक लाख रुपये दंड ठोठावला होता. अहमद मोईउद्दीनने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अपील केले. न्यायमूर्ती एम. टी. जोशी यांच्यासमोर सुनावणी झाली असता त्यांनी जिल्हा न्यायालयाची शिक्षा कायम ठेवत आरोपीचे अपील फेटाळले.
औरंगाबाद दहशतवादविरोधी पथकातील जमादार अंकुश राठोड यांना मिळालेल्या गुप्त माहितीआधारे पोलीस निरीक्षक किशोर कांबळे, शिवा ठाकरे, गोरख जाधव, शशिकांत शिनगारे आदी ३२ कर्मचाऱ्यांच्या पथकाने १७ जानेवारी २०११ रोजी सिडको बसस्थानकावर सापळा रचून अहमद मोईउद्दीनला ताब्यात घेतले होते. त्याच्या जवळच्या बॅगेची झडती घेतली असता त्यामध्ये उग्र दर्प असलेल्या हिरवट काळ्या रंगाच्या ओलसर व बुरशी आलेल्या गोळ्या सापडल्या. त्या गोळ्या चरस असल्याचे मोईउद्दीनने सांगितले. पोलीस निरीक्षक राजकुमार सोनवणे यांच्या तक्रारीवरून अहमद मोईउद्दीनविरुद्ध एटीएसचे पोलीस ठाणे असलेल्या मुंबई येथील काळा घोडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
या खटल्याची सुनावणी औरंगाबादेतील विशेष सत्र न्यायाधीश (एनडीपीएस) एस. जी. शेटे यांच्यासमोर झाली असता सहायक लोकअभियोक्ता राजेंद्र मुगदिया यांनी युक्तीवाद केला. न्यायालयाने ही विनंती गाह्य धरून चरसची तस्करी करणाऱ्यास १० वर्षे सक्तमजुरी, १ लाख रुपये दंड, दंड न भरल्यास एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली होती. या शिक्षेस अहमद मोईउद्दीन याने औरंगाबाद खंडपीठात अपील दाखल केले. या अपिलावर न्यायमूर्ती एम. टी. जोशी यांच्यासमोर सुनावणी झाली असता सरकारी वकील राजेंद्र ढासळकर यांनी बाजू मांडली. चरस तस्करास अधिक शिक्षा देण्यात यावी, असा युक्तिवाद केल्याने खंडपीठाने वरील आदेश दिला.