आजपासून छठपूजा उत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 12:34 AM2017-10-24T00:34:42+5:302017-10-24T00:34:42+5:30
मंगळवारपासून छठपूजा उत्सवाला सुरुवात होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाळूज महानगर : मंगळवारपासून छठपूजा उत्सवाला सुरुवात होत आहे. चार दिवस चालणा-या या मंगलमयी उत्सवानिमित्त बजाजनगर परिसरात विविध, धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
येथील रामलीला मैदानावर मंगळवारी चतुर्थीनिमित्त नहाये-खाये हा कार्यक्रम पार पडणार आहे. २४ आॅक्टोबरला बुधवारी पंचमीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहे. २५ आॅक्टोबरला गुरुवारी षष्ठीनिमित्त मावळत्या सूर्याला दुग्ध अर्घ्य दिला जाणार आहे. २६ आॅक्टोबरला शुक्रवारी सप्तमीनिमित्त उगवत्या सूर्यदेवतेची पूजा करून छठपूजा उत्सवाची सांगता करण्यात येणार आहे. या छठपूजा उत्सवाला उत्तर भारतीय नागरिक व भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन पुजारी राजेश्वरानंद पांडे, विनोद पंडित, सुगंध सिंह, मनोज पंडित, राजन प्रजापती, सारिका सिन्हा, स्नेहा श्रीवास्तव, विक्रम साहा, नीरज पंडित, सोनल सिंह, धीरज पंडित आदींनी केले आहे.
वाळूज औद्योगिक वसाहतीत रोजगार व व्यवसायानिमित्त मोठ्या प्रमाणात उत्तर भारतीय या परिसरात वास्तव्यास आले आहेत. उत्तर भारतात छठपूजा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. वर्षातील महत्त्वाचा हा सण मूळ गावी जाऊन साजरा करणे अनेकांना शक्य नसल्यामुळे या परिसरातील बहुतांश उत्तर भारतीय नागरिक गेल्या काही वर्षांपासून बजाजनगरात हा छठपूजा उत्सव साजरा करीत आहे.
भाविकांनी केले श्रमदान
उत्तर भारतीय नागरिकांनी छठपूजेनिमित्त श्रमदान करून बजाजनगरातील रामलीला मैदानाची स्वच्छता केली. यावेळी परिसर स्वच्छ करून केर-कचºयाची विल्हेवाट लावण्यात आली असून हौदाची स्वच्छता करण्यात आली.