कचरा कोंडीस सरकारच जबाबदार; शिवसेनेने जिल्हाधिकारी कार्यालयात टाकला कचरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 01:23 PM2018-07-19T13:23:48+5:302018-07-19T13:29:27+5:30
शहरातील कचरा कोंडीस सरकार जबाबदार असून मुख्यमंत्र्यांच्या मनपा बरखास्तीच्या इशाऱ्याचा निषेध करत शिवसेनेने जिल्हाधिकारी कार्यालयात दोन ट्रक कचरा टाकला.
औरंगाबाद : शहरातील कचरा कोंडीस सरकारच जबाबदार असून मुख्यमंत्र्यांच्या मनपा बरखास्तीच्या इशाऱ्याचा निषेध करत शिवसेनेने आज दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात तब्बल दोन ट्रक कचरा टाकला.
कचरा कोंडीचा आजचा १५३ वा दिवस आहे. बुधवारी नागपूर येथे मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नी एक बैठक घेतली. यात त्यांनी कचरा प्रश्न वेळेत सोडवला नाही तर मनपा बरखास्त करेल असा इशारा दिला. यावर शिवसेनेने कचरा प्रश्न सोडविण्याची जबाबदारी सरकारची असल्याचे स्पष्ट केले आणि मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या इशाऱ्याचा निषेध करत जिल्हाधिकारी कार्यालयात तब्बल दोन ट्रक कचरा टाकला.
महापौर आणि उपमहापौर मनपा प्रशासनासह चार महिन्यांपासून सुरु असलेला कचरा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, हा प्रश्न सोडविण्याचा संपूर्ण अधिकार कोर्टाने नियुक्त केलेल्या समितीस व मनपा प्रशासनास आहे. यामुळे मुख्यमंत्र्यांनी नागपूर येथे बैठकीत मनपा बरखास्तीचा इशारा चुकीची आहे अशा आशयाचे निवेदन यावेळी शिवसेनेने अप्पर जिल्हाधिकारी पी.एल. सोरमारे यांना सादर केले.
दरम्यान, तब्बल दोन ट्रक कचरा जिल्हाधिकारी कार्यालयात टाकल्याने येथे प्रचंड दुर्गंधी पसरली आहे.