एक लाखाची खंडणी घेताना दोन एजंट अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 01:15 AM2017-12-01T01:15:38+5:302017-12-01T01:16:02+5:30
लिपिक महिलेला नोकरी घालविण्याची धमकी देऊन तिच्याकडून एक लाख रुपये खंडणी उकळणाºया दोन जणांना गुन्हे शाखा पोलिसांनी सापळा रचून गुरुवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास रंगेहाथ पकडले. ही कारवाई आरटीओ कार्यालयातील सहायक आरटीओ श्रीकृष्ण नकाते यांच्या कक्षात करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : लिपिक महिलेला नोकरी घालविण्याची धमकी देऊन तिच्याकडून एक लाख रुपये खंडणी उकळणाºया दोन जणांना गुन्हे शाखा पोलिसांनी सापळा रचून गुरुवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास रंगेहाथ पकडले. ही कारवाई आरटीओ कार्यालयातील सहायक आरटीओ श्रीकृष्ण नकाते यांच्या कक्षात करण्यात आली.
विनोद फुलचंद गंगवाल (५७, रा. मारवाडी गल्ली, वाळूज) आणि अरुण दगडू माडूकर (५४, रा. जालाननगर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. गुन्हे शाखेचे निरीक्षक शिवाजी कांबळे यांनी सांगितले की, तक्रारदार महिलेचे वडील २० वर्षांपूर्वी अपघातात मरण पावले. यानंतर ती आरटीओ कार्यालयात लिपिकपदी नोकरीला लागली. आरोपी विनोद हा आरटीओ कार्यालयात एजंट म्हणून काम करतो तर अरुण हा माहिती अधिकार कार्यकर्ता आहे. शिवाय त्याचे स्टेशनरीचे दुकान आहे. त्यांनी तीन महिन्यांपूर्वी तक्रारदार महिलेची भेट घेतली आणि आम्ही तुमच्यासंबंधी अनेक महत्त्वाची कागदपत्रे आमच्या हाती लागली आहेत. त्या कागदपत्रांच्या आधारे वरिष्ठांकडे तक्रार केल्यास तुझी नोकरी जाऊ शकते, अशी थेट धमकीच त्यांनी दिली. तुला नोकरी टिकवायची असेल तर आम्हाला दोन लाख रुपये खंडणी द्यावी लागेल, असे ते म्हणाले. सुरुवातीला काही दिवस त्यांच्या म्हणण्याकडे तक्रारदारांनी दुर्लक्ष केले. मात्र गेल्या काही दिवसांपासून पैसे देता अथवा तुमची तक्रार करू, अशा प्रकारे ते तक्रारदार यांना ब्लॅकमेल करीत होते. एवढी रक्कम एकदाच देणे शक्य नसेल तर दोन टप्प्यात द्या, असे त्यांनी सांगितले.