कंटेनरखाली दबून दोन भाऊ जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2017 01:04 AM2017-09-10T01:04:40+5:302017-09-10T01:04:40+5:30
भरधाव कंटेनर दुभाजकावर आदळल्याने पलटी होऊन झालेल्या अपघातात सख्खे भाऊ असलेले चालक आणि क्लिनर कंटेनरखाली दबून जागीच ठार झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
करमाड : भरधाव कंटेनर दुभाजकावर आदळल्याने पलटी होऊन झालेल्या अपघातात सख्खे भाऊ असलेले चालक आणि क्लिनर कंटेनरखाली दबून जागीच ठार झाले. जालना रस्त्यावर गोलटगाव फाट्याजवळ शनिवारी पहाटे हा अपघात झाला. कंटेनर चालवीत असलेला चालक जितेंद्रसिंग देवनारायणसिंग याने उडी मारल्याने तो बचावला, तर झोपेत असलेला दुसरा चालक दिलीप योगेश तिरके (३०), क्लिनर तनिष योगेश तिरके (२७) या दोघांचा मृत्यू झाला.
पुण्याहून एलईडी टीव्ही घेऊन झारखंडकडे जात असताना गोलटगाव फाट्यावरील वळणावर कंटेनर (क्रमांक सी. जे.०४ एल. एल.६९५४) च्या चालकाचा ताबा सुटल्याने दुभाजकावर आदळून वाहन पलटी झाले. अपघाताच्या घटनेमुळे वाहतूक खोळंबली होती. करमाड पोलिसांनी घटनास्थळ गाठून वाहतूक सुरळीत केली व कंटेनरखाली दबलेल्या दोन्ही भावाला क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढले. दोघांना औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले.
अपघातप्रकरणी अनुराज जिरोन कुजर (रा. झारखंड) यांच्या फिर्यादीवरून कंटेनर चालक जितेंद्रसिंग देवनारायणसिंग (रा. झारखंड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक गोरख शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शरदचंद्र रोडगे करीत आहेत.