दोनच ग्रा.प.मध्ये पायका योजना
By Admin | Published: June 25, 2014 01:17 AM2014-06-25T01:17:53+5:302014-06-25T01:28:12+5:30
अशोक कारके , औरंगाबाद केंद्र शासनाच्या पायका क्रीडा योजनेचा जिल्ह्यातील १५७ ग्रामपंचायतींनी दोन वर्षांत दीड कोटी रुपये उचलले; परंतु केवळ २ ग्रामपंचायतींनी या निधीचा योग्य वापर केला आहे.
अशोक कारके , औरंगाबाद
केंद्र शासनाच्या पायका क्रीडा योजनेचा जिल्ह्यातील १५७ ग्रामपंचायतींनी दोन वर्षांत दीड कोटी रुपये उचलले; परंतु केवळ २ ग्रामपंचायतींनी या निधीचा योग्य वापर केला आहे.
ग्रामीण भागातील खेळाडूंना चालना मिळावी व त्यातून उत्तम खेळाडू तयार व्हावेत यासाठी केंद्रीय पंचायत युवा क्रीडा व खेळ अभियान (पायका) ही योजना २००८-२००९ पासून राबविण्यात येत आहे.
२००८-९ मध्ये ८४, तर २००९- १० मध्ये ७३ ग्रामपंचायतींना पायकांतर्गत मैदान तयार करण्यासाठी प्रत्येकी एक लाख रुपये निधी दिला गेला. यापैकी ८४ पैकी फक्त दोनच ग्रामपंचायतींनी काम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांकडे सादर केले आहे.
गेल्या पाच वर्षांपासून योजनेच्या आढावा बैठकीत गटविकास अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना मैदानाचे काम पूर्ण झाले आहे, काम पूर्णत्वाचा दाखला देतो, असे गेल्या अनेक बैठकांमध्ये सांगत आहेत व जिल्हा क्रीडा विभागातील अधिकारी तलाठी व ग्रामसेवकाकडे काम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र सादर करा, अशी मागणी करीत आहेत, असे सूत्रांनी सांगितले.
२००८-९ व २००९-१० आर्थिक वर्षात १५७ ग्रामपंचायतींना मैदान तयार करण्यासाठी १ कोटी ५७ लाख रुपये केंद्र व राज्य शासनाने दिले.
प्रत्येक ग्रामपंचायतीला दहा हजार रुपयांचे क्रीडा साहित्यही दिले. यासाठी १५ लाख ७० हजार रुपये खर्च झाला.
गेल्या पाच वर्षांत १५७ ग्रामपंचायतींपैकी २००८-९ मध्ये सिल्लोड तालुक्यातील उंडणगाव व केऱ्हाळा या ग्रामपंचायतींनी मैदानाचे काम पूर्ण केल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना दिली आहे.
२००९-१० मध्ये मात्र पैसे मिळालेल्या ७३ पैकी एकही ग्रामपंचायत काम पूर्ण करू शकली नाही.
योजनेत केंद्राचा ७५ टक्के व राज्य शासनाचा २५ टक्के वाटा आहे.
योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातून आॅलिम्पिक दर्जाचे खेळाडू तयार होतील, असा हेतू आहे.
हॉलीबॉल, फुटबॉल, गोळा, थाळीफेक आदी साहित्य ग्रामपंचायतींना वाटप करण्यात आले आहे.
निधी परत जाणार
लवकरच ग्रामपंयायतींनी काम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र सादर न केल्यास मैदान तयार करण्यासाठी दिलेला निधी परत करण्याचे आदेश संबंधित ग्रामपंचायतींना दिले जातील.
-चंद्रकांत कांबळे,
उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा
५० टक्के काम अपूर्ण
गटविकास अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी व ग्रामसेवकांच्या बैठका घेतल्या आहेत. ५० टक्के ग्रामपंचायतींचे काम पूर्ण झाले आहे. जुलैअखेरपर्यंत सर्वच ग्रामपंचायतींचे काम पूर्ण होईल. काही ग्रामपंचायतींचा जागेचा प्रश्न होता. तो सुटला आहे.
-ऊर्मिला मोराळे,
जिल्हा क्रीडा अधिकारी
ग्रामपंचायती
जिल्ह्यातील एकूण
ग्रामपंचायती- ८५९
२००८-२००९ व २००९-२०१० या वर्षी पायकाचा लाभ मिळालेल्या ग्रामपंचायती- १५७
गेल्या पाच वर्षांत काम पूर्णत्वाचे प्रमाणपत्र सादर केलेल्या ग्रामपंचायती- २