अशी केली दोन वर्षांत ५८ किलो सोन्याची हेराफेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2019 11:39 PM2019-07-04T23:39:59+5:302019-07-04T23:40:30+5:30
औरंगाबाद : वामन हरी पेठे ज्वेलर्सचा व्यवस्थापक अंकुर राणे याने दुकानातील सुवर्णलंकार विक्री झाल्याच्या पावत्या तयार करून त्यावर दुकानाच्या ...
औरंगाबाद : वामन हरी पेठे ज्वेलर्सचा व्यवस्थापक अंकुर राणे याने दुकानातील सुवर्णलंकार विक्री झाल्याच्या पावत्या तयार करून त्यावर दुकानाच्या नियमाप्रमाणे दागिन्याचे टॅग लावत होता. त्यामुळे दुकान मालकास या विक्री व्यवहाराविषयी संशय येत नव्हता. राणेने ग्राहक राजेंद्र जैन, भारती जैन आणि लोकेश जैन यांना काही दागिने विक्री केल्याचे दाखविले. त्या बदल्यात जैन कुटुंबियाकडून रोख रकमेऐवजी धनादेश घेतले. या पद्धतीने दोन वर्षांत तब्बल ५८ किलो सोन्याचे अलंकार दुकानातून पळविण्यात आले. जैन यांच्याकडून घेतलेले बहुतेक धनादेश अनादरीत झालेले आहेत.
राणे याने दोन वर्षांपासून सोन्याची हेराफेरी सुरू केली. सुवर्णपेढीतील सर्व खरेदी-विक्रीचा व्यवहार अॉनलाईन असल्याने हा प्रकार मालकांच्या निदर्शनास येऊ शकतो, ही बाब राणेला माहीत होती. दागिन्यांची चोरी केल्यानंतर त्या दागिन्यांचे बारकोड टॅग काढून तो दागिना विक्री केल्याची नोंद रजिस्टरला घेई. त्याबाबतचे बनावट बिल (पावती) तो तयार करीत होता. दोन वर्षांच्या कालावधीत राणेने ११ कोटी ८८ लाख ४९ हजार ४२६ रुपयांचे दागिने विक्री केल्याची ४६६ बनावट बिले (पावत्या) तयार केल्याचे समोर आले. दागिने विक्री केल्याच्या पावत्या आणि दुकानाच्या हिशेब वहीतील नोंदीमध्ये ६ कोटी ४३ लाख रुपयांची तफावत असल्याचे दुकानमालक विश्वनाथ पेठे यांच्या लक्षात आले. याबाबत राणेकडे त्यांनी जाब विचारल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
राणेला २५ टक्के हिस्सा
सोने चोरीच्या गोरखधंद्यात आरोपी राजेंद्र जैन, भारती जैन आणि लोकेश जैन हे समान भागीदार होते. चोरलेल्या दागिन्याच्या किमतीची २५ टक्के रक्कम अंकुर राणेला मिळत होती, तर उर्वरित तिघे हे ७५ टक्क्यांत वाटेकरी होते. दागिन्यांच्या किमतीची २५ टक्के रक्कम मिळत गेल्याने जैन हा आपला मोठा ग्राहक असल्याचे सांगून राणे त्याला उधारीवर दागिने देत असल्याचे सहकारी कर्मचाऱ्यांना सांगत असे.
गुन्ह्याची कबुली देणारा मुख्य कार्यालयास ई-मेल
दोन वर्षांत ५८ किलो सोन्याचे दागिने चोरल्याची कबुली देणारा ई-मेल आरोपी राणे याने वामन हरी पेठे ज्वेलर्सच्या मुंबईतील मुख्य कार्यालयात पाठविला. या ई-मेलमध्ये राणेने नमूद केले की, ‘मी राजेंद्र जैन, भारती जैन व लोकेश जैन यांनी संगनमताने गुन्हा केलेला आहे. दुकानातील चोरी केलेला माल २० जून २०१९ पर्यंत आणून देतो.’