पत्रप्रपंचातून जिल्हा परिषद अंतर्गत राबविणार जनजागृतीचा अनोखा उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2016 12:10 AM2016-09-03T00:10:27+5:302016-09-03T00:30:49+5:30
संजय तिपाले , बीड ‘सप्रेम नमस्कार, विनंती विशेष...’ हे पोस्टकार्डवरील शब्द आधुनिक तंत्रज्ञानात दुर्मिळ होत असताना जिल्हा परिषदेने मात्र पाणंदमुक्तीची मोहीम
संजय तिपाले , बीड
‘सप्रेम नमस्कार, विनंती विशेष...’ हे पोस्टकार्डवरील शब्द आधुनिक तंत्रज्ञानात दुर्मिळ होत असताना जिल्हा परिषदेने मात्र पाणंदमुक्तीची मोहीम गतिमान करण्यासाठी पत्राची मात्रा वापरली आहे. विद्यार्थी व नातेवाईकांमार्फत पत्र पाठवून शौचालय बांधण्याची भावनिक विनंती केली जात आहे. अवघ्या ५० हजार रुपयांत एक लाख कुटुंबियांपर्यंत पोहोचण्याचा हा पत्रप्रपंच मोहिमेसाठी फलदायी ठरत आहे.
जि.प. सीईओ नामदेव ननावरे यांच्या संकल्पनेतून ‘नातं जबाबदारीचं’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविला जात आहे. त्यांतर्गत १५ हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांमार्फत २५ हजार कुटुंबियांना शौचालय बांधून देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. कर्मचाऱ्यांनी आपल्या जवळच्या मित्रांना, नातेवाईकांना शौचालय बांधून द्यायचे आहे. सीईओंनी त्यासाठी पावतीपुस्तके छापली असून भेटावयास येणाऱ्या प्रत्येकाला ते शौचालय बांधण्यास प्रवृत्त करतात. आमूक नातेवाईकांना मी शौचालय बांधून देत असल्याचे या पावतीपुस्तकात कर्मचाऱ्यांनी नोंद करावयाची आहे. दरम्यान, जि.प. मार्फत कर्मचाऱ्यांनी ज्या नातेवाईकाला शौचालय बांधून देण्याचे आश्वासन दिले, त्याचे काय झाले? हे जाणून घेण्यासाठी पत्रव्यवहार केला जाणार आहे.
यालाच जोडून आता दुसरा उपक्रम आहे तो पत्राचा! विद्यार्थी, अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, आरोग्यसेवक यांच्यामार्फत नातेवाईक, मित्र व त्यांच्या पाहणीत असलेल्या कुटुंबियांना पत्राद्वारे शौचालय बांधण्याची गळ घातली जाणार आहे. याशिवाय सीईओंसह सर्व विभागप्रमुख व गटविकास अधिकाऱ्यांना कामानिमित्त भेटावयास येणाऱ्या नागरिकांच्या हातात कोरे पत्र ठेवून त्यांच्यामार्फत शौचालय बांधून घेण्याची विनंती इतरांना केली जाणार आहे. त्याची स्वतंत्र नोंद ठेवून वेळोवेळी पाठपुरावा करण्यात येणार आहे.
या अनोख्या उपक्रमातून ५० हजार रुपयांत १ लाख कुटुंबांना पाणंदमुक्तीचा संदेश दिला जाणार आहे. ही मोहीम फलदायी ठरावी यासाठी अधिकारी, कर्मचारी जोमाने कामाला लागले आहेत.