महावितरणचा ‘फ्रँचायजी’चा प्रयोग तूर्त टळला; दूरगामी नियोजनाचे संचालकांकडून सादरीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 01:39 PM2018-01-19T13:39:58+5:302018-01-19T13:47:47+5:30
राज्यभरातील शहरे व ग्रामीण भागात वीजपुरवठा सुरळीत करणे, खंडित करणे, दुरुस्ती, बिलाची वसुली, मीटर रीडिंग, वीजचोरी रोखणे आदी कामांचे दूरगामी नियोजन करण्यात आल्याचे वीज कर्मचारी संघटनांच्या बैठकीत महावितरणचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमार यांनी दिले. त्यामुळे औरंगाबाद व जळगाव शहरातील वीजपुरवठ्याचे काम खाजगी संस्थेकडे (फ्रँचायजी) देण्याच्या हालचाली तूर्तास टळल्या असल्याचे स्पष्ट झाले आहे.
औरंगाबाद : राज्यभरातील शहरे व ग्रामीण भागात वीजपुरवठा सुरळीत करणे, खंडित करणे, दुरुस्ती, बिलाची वसुली, मीटर रीडिंग, वीजचोरी रोखणे आदी कामांचे दूरगामी नियोजन करण्यात आल्याचे वीज कर्मचारी संघटनांच्या बैठकीत महावितरणचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमार यांनी दिले. त्यामुळे औरंगाबाद व जळगाव शहरातील वीजपुरवठ्याचे काम खाजगी संस्थेकडे (फ्रँचायजी) देण्याच्या हालचाली तूर्तास टळल्या असल्याचे स्पष्ट झाले आहे.
महावितरण कंपनीतील प्रमुख सहा कर्मचारी संघटनांच्या कृती समितीसमोर मुख्य व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमार कर्मचार्यांकडे सोपविण्यात येणार्या जबाबदारीचे सादरीकरण केले. येत्या १ एप्रिलपासून महावितरणच्या संचलन व सुव्यवस्थेसाठी स्वतंत्र तीन विभाग अस्तित्वात येणार आहेत. कर्मचार्यांची कपात न करता आहे त्या कर्मचार्यांची विभागणी तीन विभागांत केली जाणार आहे. सुपरवायझर केडरमधील कर्मचारी प्रत्यक्षात फिल्डवरील कामासाठी नियुक्त केले जातील. वीज ग्राहकांना दरमहा बिलासंबंधीचा संदेश मोबाईलवरच दिला जाईल. यापुढे एप्रिलपासून तांत्रिक कामगार ज्या विभागात कार्यरत असतील त्यांच्यावर त्याच कामांची जबाबदारी राहील. शहरी व निमशहरी भागात विद्युत पुरवठ्यासंबंधीची दुरुस्ती, दुरुस्तीसाठी विद्युत पुरवठा बंद ठेवणे, बिल न भरणार्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करणे, बिल भरल्यास पुन्हा वीज जोडणे आदी कामांसाठी स्वतंत्र पथके कार्यरत केली जातील. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर ग्रामीण भागात त्याची अंमलबजावणी केली जाईल.
भविष्यात मीटर प्रयोगशाळा अस्तित्वात आणण्याचा महावितरणचा मानस आहे. १ एप्रिलपासून सहायक अभियंता हे बिलिंग विभागाचे प्रमुख असतील. त्यांच्यावरच यापुढे ग्राहकांच्या बिलासंबंधीच्या तक्रारी, मीटर रीडिंग, वीज चोरीचे बिल, थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची जबाबदारी असेल. ग्रामीण उपविभागात बिलिंग व महसूलसाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यरत केली जाणार आहे. बहुतेक सर्वच कामे आॅनलाईन होतील. त्यामुळे प्रचलित टिपणी लिहिण्याची कामे इतिहासजमा होतील.
तांत्रिक कामगार समाधानी
महावितरणने तब्बल ५७ वर्षांनंतर कर्मचार्यांच्या कामाची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतला असून, तांत्रिक कामगारांवरील मोठा ताण यामुळे कमी होणार आहे. महावितरणच्या कार्यपद्धतीची पुनर्रचना राज्यातील १६ झोन, ४४ सर्कल, १४० विभाग, ६६३ उपविभाग व ३२२८ शाखा कार्यालयांमध्ये होणार आहे. महावितरणच्या या निर्णयामुळे तांत्रिक कामगार संघटनेचे अध्यक्ष एन. के. मगर, सरचिटणीस सय्यद जहिरोद्दीन, भाऊसाहेब भाकरे, टी. डी. कोल्हे, आर. पी. थोरात आदींनी समाधान व्यक्त केले आहे.