जलसंपदा विभाग सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर
By Admin | Published: September 12, 2016 11:20 PM2016-09-12T23:20:36+5:302016-09-12T23:22:39+5:30
औरंगाबाद : राज्यात जलसंपदा खात्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची ४० टक्क्यांपेक्षा अधिक पदे रिक्त झाली आहेत. शिवाय येत्या चार वर्षांत आणखी पाच हजार अधिकारी, कर्मचारी सेवानिवृत्त होणार आहेत.
औरंगाबाद : राज्यात जलसंपदा खात्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची ४० टक्क्यांपेक्षा अधिक पदे रिक्त झाली आहेत. शिवाय येत्या चार वर्षांत आणखी पाच हजार अधिकारी, कर्मचारी सेवानिवृत्त होणार आहेत. त्यामुळे या विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण वाढतो आहे. दुसरीकडे शासनाकडून रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबविण्याकडे दुर्लक्ष होत आहे.
आकृतिबंधानुसार राज्यभरात जलसंपदा विभागांतर्गत एकूण ४५ हजार पदे मंजूर आहेत. यामध्ये शिपाई, कारकून, कालवा निरीक्षक, कनिष्ठ अभियंता, शाखा अभियंता, उपअभियंता, कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभियंता, मुख्य अभियंता यासह सर्वच पदांचा समावेश आहे. सध्या यातील २८ हजार अधिकारी, कर्मचारीच कार्यरत आहेत. गेल्या काही वर्षांपासून जलसंपदा खात्यातील अधिकारी, कर्मचारी खूप मोठ्या संख्येने सेवानिवृत्त होत आहेत. परिणामी एकेका अधिकाऱ्यांकडे दोन दोन पदांचा पदभार सोपविण्यात आलेला आहे. शिवाय कनिष्ठ कर्मचाऱ्यांनाही कामाचा ताण सहन करावा लागत आहे. मेअखेरीस एकाच महिन्यात जलसंपदा विभागातील तब्बल १२०० कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत. याशिवाय चालू महिन्यात म्हणजे सप्टेंबरअखेरीसही १६१ अधिकारी, कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत. सध्या कार्यरत असलेले अधिकारी, कर्मचारी सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत. येत्या चार वर्षांत खात्यातील तब्बल पाच हजार अधिकारी, कर्मचारी सेवानिवृत्त होणार असल्याचे जलसंपदा खात्यातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
एकट्या औरंगाबाद लाभक्षेत्र विकास प्राधिकरण (कडा) कार्यालयांतर्गत २३९२ पदांपैकी तब्बल १३१४ पदे रिक्त आहेत. कडा कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात औरंगाबाद, जालना आणि परभणी हे तीन जिल्हे येतात. रिक्त पदांपैकी बहुसंख्य पदे ही सिंचन व्यवस्थापनाशी निगडित आहेत. त्यामुळे सिंचन व्यवस्थापनाच्या कामावर त्याचा विपरीत परिणाम होतो आहे. कालवा निरीक्षकाच्या ६०० मंजूर पदांपैकी सध्या केवळ १५२ कालवा निरीक्षकच कार्यरत आहेत. उर्वरित ४४८ पदे रिक्त आहेत. त्याचप्रमाणे दप्तर कारकुनाच्या १९५ पदांपैकी १०३ पदे रिक्त आहेत. मोजणीदाराच्या ३०० पदांपैकी १९५ पदे रिक्त आहेत. त्याचप्रमाणे इतर संवर्गातीलही असंख्य पदे रिक्त आहेत. शिवाय प्रत्येक महिन्यात अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने सेवानिवृत्त होत आहेत. या पार्श्वभूमीवर सिंचन कर्मचारी संघटनेने काही दिवसांपूर्वीच रिक्त पदे भरण्याची मागणी केली आहे.