मराठी नववर्षाचे जल्लोषात स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 01:28 AM2018-03-19T01:28:59+5:302018-03-19T10:25:27+5:30

मराठी नववर्षाच्या निमित्ताने राजाबाजार येथून निघालेली शोभायात्रा लक्षवेधी ठरली. श्री शंकराची ८ फूट उंचीची मूर्ती... बालवारकऱ्यांनी खेळलेली पावली... अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराज, झांशीची राणी, मावळे... श्रीराम, सीता, लक्ष्मणाचा सजीव देखावा...आणि महिलांचा उत्स्फूर्त सहभाग, हे या शोभायात्रेचे वैशिष्ट्ये ठरले.

Welcome to the celebration of Marathi New Year | मराठी नववर्षाचे जल्लोषात स्वागत

मराठी नववर्षाचे जल्लोषात स्वागत

googlenewsNext

औरंगाबाद : मराठी नववर्षाच्या निमित्ताने राजाबाजार येथून निघालेली शोभायात्रा लक्षवेधी ठरली. श्री शंकराची ८ फूट उंचीची मूर्ती... बालवारकऱ्यांनी खेळलेली पावली... अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराज, झांशीची राणी, मावळे... श्रीराम, सीता, लक्ष्मणाचा सजीव देखावा...आणि महिलांचा उत्स्फूर्त सहभाग, हे या शोभायात्रेचे वैशिष्ट्ये ठरले.

हिंदू नववर्ष स्वागत समितीच्या वतीने सायंकाळी ५.३० वाजता राजाबाजार येथील संस्थान गणपती मंदिर परिसरातून मुख्य शोभायात्रा काढण्यात आली. गुरुवर्य प्रसाद अंमळनेरकर महाराज एका सजविलेल्या रथात विराजमान झाले होते. त्यांच्या उपस्थितीने सर्वांचा आनंद द्विगुणित झाला होता.
प्रारंभी, खा. चंद्रकांत खैरे, महापौर व समितीचे अध्यक्ष नंदकुमार घोडेले, माजी महापौर अनिता घोडेले , अंबादास दानवे आदींच्या हस्ते संस्थान गणपतीची आरती करण्यात आली. जगद्गुरू नरेंद्रचार्य महाराज संस्थानच्या वतीने शेकडो भाविक शोभायात्रेत सहभागी झाले होते. सामाजिक संदेश देणारे फलक प्रत्येक महिला भाविकांच्या हाती होते. एका रथात समोरील बाजूस नरेंद्रचार्य महाराजांच्या वेशभूषेत कुणाल उबरे हा बालक तर पाठीमागील बाजूस संत गजानन महाराज यांच्या वेशभूषेत कैलास काकडे विराजमान झाले होते. ८५ वर्षांचे नारायणसिंह होलिये उंटावर स्वार झाले होते. त्यांच्या हातात राजस्थानमधून आणलेली मशाल तेवत होती. श्याम पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज तर वैशाली उणे हिने झांशीच्या राणीची वेशभूषा केली होती.

याशिवाय चार वेगवेगळ्या वाहनात श्रीराम, सीता, लक्ष्मण यांचा सजीव देखावा सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. महाराष्ट्र वीरशैव समाजाच्या वतीने श्री शंकर, पार्वतीचा सजीव देखावाही उत्कृष्ट होता. हिंदू जनजागृती समितीच्या वतीने ‘भारतीय संस्कृती, वेशभूषा’चे दर्शन घडविणारा बालकांच्या सजीव देखाव्यानेही सर्वांना मोहित केले. जय चतुर्थी प्रतिष्ठानच्या वतीने ८ फूट उंचीची शंकर भगवानाची मूर्ती सर्वांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरली. याशिवाय बजरंग दलाने ‘गाय-वासरू’चा देखावा तर जय भगवान महासंघाच्या रथात भगवानबाबाची प्रतिमा ठेवण्यात आली होती. आर्य समाजाच्या वतीने एका वाहनावर यज्ञ सुरू होता. गायत्री मंत्राचा अखंड जप करण्यात येत होता. विविध बँडपथकांनीही भक्तिगीत सादर करून सहभागींना थिरकण्यास भाग पाडले. शोभायात्रा पाहण्यासाठी शहरवासीयांनी मोठी गर्दी केली होती.शोभायात्रा शहागंज, सराफा रोड, सिटीचौक, मछली खडक, गुलमंडी, औरंगपुरा, नागेश्वरवाडीमार्गे खडकेश्वर मंदिराच्या मैदानावर पोहोचली. मैदानात हजारो भाविकांनी गुरुवर्य प्रसाद अंमळनेरकर महाराजांचे प्रवचन ऐकले. शोभायात्रा हिंदू नववर्ष समिती पदाधिका-यांनी प्रयत्न केले.

Web Title: Welcome to the celebration of Marathi New Year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.