खिळखिळ्या बसमध्ये वाय-फाय!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 01:19 AM2017-10-29T01:19:51+5:302017-10-29T01:20:13+5:30
डबघाईला आलेल्या ‘लाल परी ’ च्या गळ्यात आता परिवहन मंडळाने वाय-फाय बसवले आहे. मात्र, खिळखिळ्या बसमध्ये बसविलेले वाय-फाय वापरणे प्रवाशांना गैरसोयीचे ठरत आहे.
शेषराव वायाळ ।
लोकमत न्यूज नेटवर्क
परतूर : डबघाईला आलेल्या ‘लाल परी ’ च्या गळ्यात आता परिवहन मंडळाने वाय-फाय बसवले आहे. मात्र, खिळखिळ्या बसमध्ये बसविलेले वाय-फाय वापरणे प्रवाशांना गैरसोयीचे ठरत आहे.
परतूर बस आगाराच्या गाड्यांची अनेक वर्षांपासून दुरवस्था झाली आहे. पत्रे उचकटले आहेत. गावांचे बोर्डही पुसट झाले आहेत. काही बसला दुस-या रंगाच्या पत्र्यांचे ठिगळ देण्यात आले आहेत. बसधमील आसनेही मोडली आहेत. चालक बसतात ते सीटसुध्दा जुगाड करून कसेबसे ठीक केलेले पाहावयास मिळत आहे. एका बसमधील चालकाचे सीट खराब झाल्याने त्याखाली दगड ठोकण्यात आला आहे. बसच्या पत्र्यांचे स्क्रूही निखळलेले आहेत. बसचे अनेक पार्ट निकामी झाले आहेत. या आगारात बसची संख्या ४९ आहे. बस, चालक व वाहकाची संख्याही अपुरी आहे. आगारात अनेक महत्त्वाच्या समस्या असताना बसमध्ये वाय-फायची यंत्रे बसविण्यात आली आहेत. बस बरोबरच रस्त्याचीही झालेली दुरवस्था यामुळे बसमधील प्रवाशांना आलेला मोबाईल उचलून बोलणे अवघड आहे. मोबाईलचा आवाजच धड येत नाही, तर या बसेसमध्ये वाय-फायची सुविधा कशी वापरणार हा प्रश्न प्रवासी उपस्थित करत आहेत. सुधारीत तंत्रज्ञानचा अवलंंब करणे ही काळाची गरज आहे. मात्र, त्या अगोदर अत्यावश्यक सुविधाही द्यायला हव्यात, असे काही प्रवाशांनी सांगितले. बसचे छतच पावसाळ्यात गळत असेल तर इंटरनेट सुविधा देणे कितपत योग्य आहे? त्यामुळे प्रवाशांना पुरवण्यात आलेल्या सेवेचा काय फायदा, हा संशोधनाचा विषय आहे.