ऊन अन् ढगाळ वातावरण, पाऊस मात्र गायब
By Admin | Published: August 4, 2014 12:00 AM2014-08-04T00:00:39+5:302014-08-04T00:53:33+5:30
विठ्ठल भिसे, पाथरी पावसाळ्याचे दिवस असूनही ढगाळ वातावरणामध्ये उन्हाची तीव्रता वाढत आहे़
विठ्ठल भिसे, पाथरी
पावसाळ्याचे दिवस असूनही ढगाळ वातावरणामध्ये उन्हाची तीव्रता वाढत आहे़ गेल्या आठ दिवसांपासून सतत ढगाळ वातावरणतही पाऊस पडला नाही़ यामुळे शेतकऱ्यांमध्ये दिवसेंदिवस चिंता वाढू लागली असून, पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही निर्माण होणार आहे़ विहिरींच्या पाणीपातळी कमी झाल्याने पाण्यावर लागवड केलेल्या कापूस पिकालाही धोका निर्माण झाला आहे़
२००५ नंतर तालुक्यामध्ये ओला दुष्काळ निर्माण झाला नाही़ तीन-चार वर्षांपासून तर सतत या तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी राहिले आहे़ पावसाच्या पाण्यावरच या भागातील शेती अवलंबून आहे़ गोदावरीचे पात्रातील बंधारे आणि जायकवाडीचा डावा कालवा हे दोन पाण्याचे स्त्रोत समाधान देणारे असले तरी मुबलक पाऊस पडत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता लागून राहिली आहे़ यावर्षी सुरुवातीपासूनच पाऊस पडतो की नाही याची साशंकता निर्माण झाली होती़ गतवर्षी उन्हाळ्यामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतकऱ्यांना झोडपून काढले तर पावसाळ्यामध्ये पावसाअभावी शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी येऊ लागले आहे़
आठ दिवसांपासून सतत ढगाळ वातावरण आहे़ परंतु, पावसाच्या पाण्याचा थेंबही पडत नाही़ जुलै महिन्याच्या प्रारंभी थोडा पाऊस झाला़ याच पावसावर या भागातील शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कापसाची लागवड केली़ पाऊस न पडल्यामुळे दुबार पेरणी करावी लागली़ दुबार पेरणी करूनही बियाणे मात्र उगवलेच नाही़ तालुक्यामध्ये एकूण क्षेत्रफळाच्या ४० टक्के एवढा भाग सोयाबीनचा पेरा आहे़ बहुतांश शेतकऱ्यांनी सोयाबीनचा पेरा कोरड्या जमिनीत केला़ अर्धे सोयाबीन उगवले अन् अर्ध्याची नासाडी झाली ही परिस्थिती तालुक्यात सर्वच भागात आहे़ एक एकर शेतात कापसाच्या दोन बॅग लागायच्या़ परंतु, पावसाअभावी तूट झाल्याने शेतकऱ्यांनी प्रती एकरी तीन बॅग कापूस लावूनही त्याची उगवण झाली नाही़ पर्यायाने आज शेती शिवाराचे माळरान झाल्याची परिस्थिती दिसून येत आहे़
शेती पिकाची अशी अवस्था असतानाही शेतातील विहिरींच्या पाण्याची पातळी पूर्णत: खालावली आहे़ वरखेड शिवारामध्ये रामदास ढगे यांच्या शेतातील विहिरीचे पाणी आटलेच नाही़ परंतु, यावर्षी पावसाळ्याच्या दिवसात या विहिरीच्या पाण्यातून जनावरांसाठी असणारा पाण्याचा हौदही भरत नाही़ नदी, नाले, कोरडे आहेत़ शेतात पाऊस नसल्याने जनावरांना चारा उपलब्ध नाही़ यामुळे तालुक्यामध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे़
शेतकरी पावसाच्या आशेवर
दररोज पाऊस येईल, या आशेवर शेतकरी दिवस काढत आहेत़ पाऊस पडत नसल्याने आणि शेतातील पिकांची परिस्थिती पाहून शेतकरी आता शेताकडे फिरकताना दिसत नाहीत़ आज पाऊस पडेल म्हणून गेल्या पंधरा दिवसांपासून आकाशाकडे डोळे लावून बसला आहे़
बाजारपेठेवरही परिणाम
पावसाळ्याच्या दिवसात बाजारपेठेमध्ये गर्दी असते़ कृषी दुकानावर तर उभे रहायलाही जागा नसते़ परंतु, पाऊस गायब झाल्याने सध्या बाजारपेठेवर त्याचा परिणाम झाला आहे़ किरणा दुकानांपासून सर्वच व्यापारी दिवसभर ग्राहकांसाठी तरसत असल्याचे दिसून येत आह़े पाऊस पडला नाही तर सर्व आर्थिक नाडीच बिघडणार असल्याच्या प्रतिक्रिया व्यापारी वर्गातूनही व्यक्त केल्या जाऊ लागल्या आहेत़