१ जानेवारीपासून युवक काँग्रेसचे ‘चलो पंचायत’ अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 11:49 PM2018-12-26T23:49:39+5:302018-12-26T23:50:33+5:30
येत्या १ जानेवारीपासून महाराष्टÑात युवक काँग्रेसतर्फे ‘चलो पंचायत’ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत युवक काँग्रेसचे कार्यकर्ते गावोगाव जातील. तेथील शेतकरी व युवकांच्या गाठीभेटी घेतील. त्यांची नोंदणी करून घेतील, अशी माहिती आज येथे प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी दिली.
औरंगाबाद : येत्या १ जानेवारीपासून महाराष्टÑात युवक काँग्रेसतर्फे ‘चलो पंचायत’ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत युवक काँग्रेसचे कार्यकर्ते गावोगाव जातील. तेथील शेतकरी व युवकांच्या गाठीभेटी घेतील. त्यांची नोंदणी करून घेतील, अशी माहिती आज येथे प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी दिली.
आज मौलाना आझाद संशोधन केंद्र, मजनू हिल येथे युवक काँग्रेसची विभागीय बैठक झाली. या बैठकीतच मराठवाड्यासह अहमदनगर जिल्ह्याचे पदाधिकारी सहभागी झाले होते. सुमारे २५ हजार गावांमधून व ५०० शहरांमधून १० फेब्रुवारीपर्यंत हे अभियान राबविण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये तीन राज्यांत काँग्रेसची सत्ता आल्याने महाराष्टÑातही बदल घडणार असा आत्मविश्वास घेऊन युवक काँग्रेसमध्ये प्राण ओतण्याचे काम सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून या विभागीय बैठकीकडे पाहिले जात आहे.
महाराष्टÑ युवक काँग्रेसच्या प्रभारी प्रतिभा रघुवंशी व सहप्रभारी मनीष चौधरी यांनी या बैठकीस मार्गदर्शन केले. बूथ कमिट्या स्थापन करतील, त्याच कार्यकर्त्यांना यापुढे पदे दिली जाणार असल्याचे मनीष चौधरी यांनी यावेळी जाहीर केले. विकास आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन आपल्याला आगामी निवडणुका जिंकायच्या असल्याचेही ते म्हणाले.
प्रतिभा रघुवंशी यांनी सांगितले की, मध्यप्रदेशात ज्या युवक कार्यकर्त्यांना कसलीही राजकीय पार्श्वभूमी नाही, त्यांनी मंत्री असलेल्या उमेदवारांनाही पाडून दाखविले. आगामी निवडणुकांमध्ये राहुल गांधी यांचे हात मजबूत करावयाचे आहेत. त्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने राहुल गांधी बनून जातीय व धर्मांध शक्तींना हरवण्यासाठी काम केले पाहिजे.
१९७८ सालचे कार्यकर्ते बनून काँग्रेसला विजयी करण्यासाठी कटिबद्ध व्हा, असे आवाहन सत्यजित तांबे यांनी यावेळी केले. वाढती बेरोजगारी, युवकांच्या प्रश्नांकडे अक्षम्य दुर्लक्ष, रोजगार निर्मितीचे खोटे आश्वासन देणाºया भाजप सरकार विरोधात राष्टÑीय युवक काँग्रेसच्या वतीने कन्याकुमारी ते काश्मीर, अशी युवा क्रांती यात्रा आयोजित करण्यात आली आहे. ही यात्रा ८ ते ११ जानेवारी या दरम्यान महाराष्टÑातून जाणार आहे. मोदी सरकारने निराश केलेल्यांना धीर देऊन त्यांना भक्कम बनविण्याची भूमिका युवक काँग्रेस निभावत असल्याचे तांबे यांनी सांगितले. शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष मुजफ्फर खान, जिल्हाध्यक्ष अब्दुल समीर, प्रभाकर मुठ्ठे पाटील, बाबासाहेब पवार, नागसेन भेरजे आदींनी या बैठकीच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.