पावसापासून बचाव करणारे हेडलॅम्पवरील प्लॅस्टिक कव्हरापासून जरा दूरच राहा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 11:27 AM2017-08-12T11:27:18+5:302017-08-12T11:40:59+5:30
मोटारसायकल व स्कूटरला पावसाळ्यात लावे जाणारे हॅण्डलकव्हर हेडलॅम्पला त्याच्या संलग्न प्लॅस्टिकने झाकते. मात्र यापासून हेडलॅम्पच्या काचेला चरे पडण्याची शक्यता असते. त्यामुळे अशी वस्तू घेताना पूर्ण व्यवहारिक दृष्टी ठेवूनच घ्यावी.
मुंबईत पावसाळा प्रत्यक्ष सुरू झाल्याशिवाय स्कूटर वा मोटारसायकलसाठी वेगवेगळ्या अॅक्सेसरीज विकत घेण्याची तयारी काही सुरू होत नाही. पावसापासून मोटारसायकलीच्या, स्कूटर्स यांच्या रक्षणार्थ वेगवेगळ्या प्रकारची कव्हर्स घेण्यासाठी बाजारात अगदी रांग लागलेली असते. शहरांमध्ये हे प्रकार सर्रास असून त्यासाठी प्रत्येक शहरात एक ठरलेली बाजारपेठ असते. दरवर्षी पावसाच्या सुरुवातीला त्या त्या भागामध्ये दिसणारी प्रत्येक बाईकवाल्याची लगबग म्हणजे शाळेतील पहिल्या दिवसासारखी वाटते. मोटारसायकलीच्या व स्कूटरीच्या हेडलॅम्प प्लॅस्टिक कव्हरचे एक मोठे शिवलेले आच्छादन येते, काहीजण त्याला हॅण्डलकव्हरही म्हणतात. हे जुन्या प्रकारातील कव्हर असून आजही ते अनेकजण वापरतात. दोरीने दोन्ही बाजूला ते बांधले जाते व हेडलॅम्पलाही दोरीने हे कव्हर गाठमारून किंवा इलेस्टिक दोरीने बांधण्याची सोय याला असते. त्यामुळे तुमचे दोन्ही हॅण्डलग्रीप, आरसे व हेडलॅम्प पावसाच्या थेट पाण्यापासून वाचतात... ( असा एक समज आहे) त्यामुळे एक्सरेटर पाणी जाऊन घट्ट होत नाही, क्लच दाबणे सुलभ राहाते, हॅण्डब्रेक्सही घट्ट होत नाही. कारण त्यात पावसाचे पाणी जात नाही. या समजापर्यंत सारे ठीक आहे. पण हेडलॅम्पमध्ये पावसाचे पाणी जात नसूनही या कव्हरामुळे मात्र तो हेडलॅम्प झाकला जातो. पारदर्शक प्लॅस्टिकमुळे त्याच्यातून प्रकाश आरपार होतो खरा पण त्यामुळे बरेच तोटे तुम्हाला सोसावे लागतात, ही बाब अनेकांच्या लक्षात येत नाही.
वास्तविक मोटारसायकल वा स्कूटरसाठी कोणत्याही प्रकारच्या अतिरिक्त अॅक्सेसरीज घेताना खूप जपून घ्याव्यात. अनेकदा त्या वस्तू नेमक्या कोणत्या दर्जाच्या आहेत, ते समजू शकत नाही. त्यांची विकत घेतल्यानंतर प्रचिती खराब आली की मग पुन्हा त्याऐवजी दुसरा पर्याय शोधावा लागतो. पावसाळ्यात हॅण्डल कव्हरामुळे एक्सरेटर, क्लच, हॅण्डब्रेक यांच्या खाचेमध्ये पाणी जाण्यापासून रोखले जाईल हे खरे असले तरी हेडलॅम्पच्या काचेवर मात्र याचे प्लॅस्टिक ज्या पद्धतीने लावले जाते व त्या प्लॅस्टिकचा दर्जा व स्तर पाहाता त्यामुळे तुमच्या हेडलॅम्पच्या काचेवर हळू हळू चरे पडू लागतात. विशेष करून दुचाकी चालवताना येणाऱ्या वाऱ्यामध्ये हे कव्हर पुढील बाजूने हेडलॅम्पच्या काचेवर घासले जाते. त्यामुळे काचेवर चरे पडण्यास सुरुवात होते. त्याचप्रमाणे धूळ, चिखल यांचाही मारा होत असतो व तो पुसला तरी प्लॅस्टिकवरून काही नीट जात नाही. गेलाच तर आतील बाजूने काचेवर पडलेले चरे हे हेडलॅम्पच्या प्रकाशाला सुस्पष्ट व प्रखर पडण्यामध्ये अडथळे ठरत असतात. यामळु शक्यतो हेटलॅम्प कव्हर होणारे ते प्लॅस्टिक तरी काढून टाकावे किंवा त्याचा दर्जा चांगला आहे की नाही हे पाहून घ्यावा. त्यापेक्षा दुसरा चांगला उपाय म्हणजे त्यावर स्टीकर प्रकारात मिळणारे पारदर्शक पांढऱ्या रंगाचे प्लॅस्टिक पाहावे. अर्थात हा प्रकार फार कमी ठिकाणी मिळतो. कार लॅमिनेट केल्या जातात, त्या ठिकाणी अशा प्रकारचे प्लॅस्टिक उपलब्ध असते. तशा प्रकारचा स्टिकर लावल्याने तुमच्या हेडलॅम्पच्या काचेचेही संरक्षण होते व काचेवर प्लॅस्टिक घासून चरे पडण्याचा धोकाही नसतो.