पीव्ही सिंधूने कोरियन ओपन सुपर सिरीजच्या फायनलमध्ये केला प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2017 12:33 PM2017-09-16T12:33:24+5:302017-09-16T15:01:58+5:30
भारताची अव्वल महिला बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने कोरियन ओपन सुपर सीरीजच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे.
सेऊल, दि. 16 - भारताची अव्वल महिला बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधू कोरियन ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेच्या विजेतेपदापासून एक पाऊल दूर आहे. सिंधूने शनिवारी चीनच्या ही बिंगजिओचा 21-10, 17-21, 21-16 असा पराभव करत कोरियन ओपन सुपर सिरीज स्पर्धेच्या अंतिमफेरीत प्रवेश केला. एक तास सहा मिनिटे हा सामना सुरु होता.
सिंधूचा अंतिम सामना जपानच्या नोझोमी ओकुहारा विरुद्ध होणार आहे. मागच्या महिन्यातच वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियशिपमध्ये ओकुहाराकडून पराभव झाल्यामुळे सिंधूला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते. सिंधूला कोरियन सुपर सिरीजच्या निमित्ताने पराभवाचा हिशोब चुकता करण्याची संधी आहे.
कोरिया ओपन सुपर सिरिज बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्वफेरीत सिंधूने ऑलिम्पिक रौप्य विजेत्या जपानच्या मितासू मितानीचा 21-19 18-21 21-10 पराभव केला होता.
या सामन्यात आक्रमक खेळाचे प्रदर्शन करताना सिंधूनं पूर्ण कोर्टचा उपयोग केला. तिचे फोरहँडच्या फटक्यांनी सामन्याचा निर्णय तिच्या बाजूने लावला. हा सामना जिंकण्यासाठी सिंधूला 63 मिनिटे लागली. पहिल्या सेटमध्ये सुरुवातीला सिंधूने 5-2 अशी आघाडी घेतली. मितानीने तिची आघाडी कमी करत पहिला सेट 8-6 असा केला. सामन्यात मिड इंटरव्हलसाठी थांबला तेव्हा मितानी 11-9 अशी आघाडीवर होती. सिंधूने त्यानंतर हा सेट 13-13 असा बरोबरीत आणला. दोन्ही खेळाडू 19-19 अश्या बरोबरीत आल्यावर सिंधूने आपला खेळ उंचावत पहिला सेट 21-19 असा जिंकला.
दुसऱ्या सेटमध्ये मितानी हिने उत्तम प्रदर्शन करताना 5-1 अशी आघाडी सिंधूने सलग गुण मिळवत तिची आघाडी 5-4 अशी केली. दुसऱ्या सेटमध्ये दोन्ही खेळाडू 8-8 अश्या बरोबरीत होत्या. त्यानंतर मितानीने सेटवर वर्चस्व गाजवत दुसरा सेट 21-16 असा जिंकत सामन्यात 1-1 अशी बरोबरी केली. तिसऱ्या आणि निर्णायक तिसऱ्या सेटमध्ये सिंधूनं आपला खेळ पहिल्यापासूनच उंचावला. या सेटमध्ये सुरुवातीला सिंधूने 6-2 अशी आघाडी मिळवली. मितानी केलेल्या चुकामुळे सिंधूने निर्णायक सेटमध्ये 9-3 अशी मोठी आघाडी मिळवली. त्यानंतर सिंधूने या सेटमध्ये वर्चस्व स्थापन करताना 15-9 अशी आघाडी मिळवली. यातून मितानीला सावरायला संधीच मिळाली नाही. शेवटचा सेट सिंधूने 21-10 असा जिंकत सामना आपल्या नावे केला.
सिंधूचा कोरिया सुपर सिरीजमधील प्रवास -
महिला एकेरीत सिंधूने शानदार खेळाचे प्रदर्शन करताना जागतिक क्रमवारीत 17 व्या स्थानी असलेल्या हाँगकाँगच्या चेउंग नगान हिला सरळ दोन गेममध्ये 21-13, 21-8 असा पराभव केला होता. ऑलिम्पिक रौप्य विजेती सिंधूने थायलंडची नितचाओन जिदापोलवर २२-२०, २१-१७ अशा फरकाने विजय नोंदविला.