सिंधू, समीर उपांत्यपूर्व फेरीत, कोरिया सुपर सिरीज बॅडमिंटन, कडव्या संघर्षानंतर कश्यप पराभूत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 02:01 AM2017-09-15T02:01:19+5:302017-09-15T02:01:58+5:30
पी. व्ही. सिंधू आणि समीर वर्मा यांनी कोरिया सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेच्या दुस-या फेरीचा अडथळा पार करीत उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली, तर पारुपल्ली कश्यपला मात्र कडव्या संघर्षानंतर पराभवाचे तोंड पाहावे लागले.
सेऊल : पी. व्ही. सिंधू आणि समीर वर्मा यांनी कोरिया सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेच्या दुस-या फेरीचा अडथळा पार करीत उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली, तर पारुपल्ली कश्यपला मात्र कडव्या संघर्षानंतर पराभवाचे तोंड पाहावे लागले.
आॅलिम्पिक रौप्य विजेती सिंधूने थायलंडची नितचाओन जिदापोलवर २२-२०, २१-१७ अशा फरकाने विजय नोंदविला. पुढील लढत आता जपानची मितासू मितानीविरुद्ध होईल. मितासू २०१४च्या विश्व चॅम्पियनशिपची कांस्य विजेती असून, २०१२च्या फ्रेंच ओपन फायनलमध्ये तिने सायना नेहवालचा पराभव करीत विजेतेपद पटकविले होते. (वृत्तसंस्था)
हाँगकाँग सुपर सिरीजमध्ये फायनल खेळणारा सय्यद मोदी ग्रॅण्डप्रिक्स गोल्ड स्पर्धेचा विजेता समीर वर्मा याने हाँगकाँगचा विग की व्हिन्सेंट याच्यावर ४१ मिनिटांत २१-१९,२१-१३ अशा फरकाने विजय नोंदविला. त्याची गाठ आता स्थानिक खेळाडू तसेच जेतेपदाचा प्रबळ दावेदार सोन वान हो याच्याविरुद्ध पडेल.
सोन वानला आज कश्यपने चांगलाच घाम गाळायला लावला. सोनने कश्यपवर एक तास १६ मिनिटांच्या कडव्या संघर्षात २१-१६, १७-२१, २१-१६ अशा फरकाने विजय नोंदवीत अखेरच्या८ खेळाडूंमध्ये स्थान निश्चित केले.
बी. साईप्रणीतही पराभूत
साईप्रणीत हा दुस-या फेरीत चिनी-तैपेईचा सातवा मानांकित ज्यु वेई वांग याच्याकडून ४० मिनिटांत १३-२१, २४-२६ अशा फरकाने पराभूत झाला. दुहेरीत मात्र साईराज रेंकीरेड्डी-चिराग शेट्टी यांनी चिनी-तैपेईची जोडी ले हुएई-ली यांग यांच्यावर ५१ मिनिटांत २३-२१, १६-२१, २१-८ ने विजय साजरा केला.