बीडमध्ये वसतिगृहातील २२ मुलांना विषबाधा
By सचिन धर्मापुरीकर | Published: July 5, 2019 04:57 PM2019-07-05T16:57:51+5:302019-07-05T16:58:43+5:30
सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.
बीड : केज तालुक्यातील शिरूर घाट येथील एका वसतिगृहातील २२ मुलांना खाद्यपदार्थामधून विषबाधा झाल्याची घटना बुधवारी मध्यरात्रीच्या वेळी घडली. त्यांच्यावर नांदूरघाट येथील आरोग्य केंद्रात उपचार केल्यानंर पुढील उपचारासाठी ८ विद्यार्थांना बीड येथील जिल्हा रुग्णालयात रात्रीच दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असून, सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.
योगेश्वरी मुलांचे बालग्राम हे वसतीगृह आहे. त्या ठिकाणी ३०० ते ३५० मुले वास्तव्यास आहेत. ते सर्व विद्यार्थी पीटी (ता. केज) येथील स्व.चांगदेवराव तांबडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शिक्षण घेतात. या ठिकाणी वास्तव्यास असणारी मुले जिल्ह्यातील विविध गावातून येतात. वसतीगृहावर राहत असल्यामुळे घरून आणलेला फराळ ते खातात. बुधवारी दुपारी यातील २२ मुलांनी मुरमुरे, चिवडा, लाडू, करंज्या, शंकरपाळे हे पदार्थ खाल्ले. त्यामधून त्यांना विषबाधा झाली असल्याचे मुलांकडून सांगण्यात आले. त्यानंतर नांदूर येथील आरोग्य केंद्रात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यापैकी ८ जणांची प्रकृती चिंताजनक वाटल्याने त्यांना जिल्हा रुग्णालायात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार केल्यानंतर, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. रुग्णालयातून गुरुवारी दुपारच्या सुमारास सर्वांना सुटी देण्यात आली. वसतीगृहात राहणारे अविनाश ढाकणे, आदित्य नवले, अमर अवटे, ओम जाधव, कृष्णा काळे, सुमित काळे दिपक काळे, ओंकार आडे या विद्यार्थ्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणले होते. त्याची प्रकृती स्थिर आहे. संस्थाचालकाने पालकांना विषबाधेविषयी माहिती दिलेली नव्हती.
संस्थाचालकाची टाळाटाळ
योगेश्वरी मुलांचे बालग्राम व विद्यालयाच्या संस्थाचालकाशी संपर्क साधला. मात्र, त्यांचा मोबाईल नंबर न देता रुग्णालयातून संस्थेच्या कर्मचाऱ्याच्या फोनवर ते बोलले, त्यांनी यावेळी उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच नाव सांगण्यास देखील नकार दिला. मुलांच्या पालकांना कळवले आहे का, असे विचारल्यानंतर मुलांवरील उपचारानंतर माहिती देणार होतो, असे त्यांनी सांगितले.