बीडमध्ये धारदार शस्त्रांसह ३६ पोती गुटखा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 12:39 AM2018-01-17T00:39:44+5:302018-01-17T00:41:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बीड : छुप्या पद्धतीने गुटखा विक्री करणाºया पेठबीडमधील इस्लामपुरा भागातील माफियाच्या घरावर मंगळवारी सकाळी पोलिसांनी धाड ...
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : छुप्या पद्धतीने गुटखा विक्री करणाºया पेठबीडमधील इस्लामपुरा भागातील माफियाच्या घरावर मंगळवारी सकाळी पोलिसांनी धाड टाकली. यामध्ये धारदार शस्त्रांसह तब्बल ३६ पोती गुटखा, एक स्कूटी व जीप जप्त करून तिघांना गजाआड केले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा व पेठबीड पोलिसांनी केली. या कारवाईने गुटखा माफियांमध्ये खळबळ उडाली आहे.
इस्लामपुरा भागात शेख सर्फराज उर्फ शप्पू याच्या घरात गुटख्याचा साठा असल्याची माहिती पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे यांना मिळाली. त्यांनी आपल्या खबºयांमार्फत खात्री करून घेतली. त्याप्रमाणे मंगळवारी सकाळी सापळा लावण्यात आला. जीपमधून गुटखा येताच पोलिसांनी शप्पूच्या घरावर छापा टाकला. यामध्ये तब्बल ३६ पोती गुटखा जप्त केला. पोलिसांनी घराची झडती घेतली असता त्याच्या घरात एक तलवार, एक कुकरी व एक सुरा असे धारदार शस्त्र आढळून आले. तसेच गुटखा वाहून नेण्यासाठी वापरण्यात आलेली नवी कोरी जीप व एक स्कूटी जप्त करण्यात आली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. गुन्हा दाखल झाल्यावरच याची खरी किंमत समोर येईल, असे पोलिसांनी सांगितले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे, पेठबीडचे पोनि बाळासाहेब बडे, सपोनि सचिन पुंडगे, परमेश्वर सानप, गोरख मिसाळ, बाबू उबाळे, मोहन क्षीरसागर, दत्तात्रय गलधर, अनिल डोंगरे, ठोंबरे, विष्णू रोकडे, पाईकराव, हरी बांगर, शेख आशेद, नाईकवाडे, जाधव, मोमीन, सानप, राठोड आदींनी केली.
अन्न सुरक्षा अधिकारी रजेवर
पोलिसांनी कारवाई करून गुटखा ताब्यात घेतला. परंतु त्यापुढील कारवाईचे अधिकारी केवळ अन्न व औषध प्रशासनाला आहेत.
येथील कार्यालयात मनुष्यबळ अपुरे आहे. केवळ एकच अन्न सुरक्षा अधिकारी आहेत. त्या सुद्धा सध्या रजेवर असल्याने त्यांचा पदभार नांदेड येथील सुरक्षा अधिकाºयांकडे आहे.
विशेष म्हणजे नांदेड येथेही मंगळवारी गुटख्याची कारवाई झालेली आहे. त्याच कारवाईत नांदेडचे सुरक्षा अधिकारी व्यस्त आहेत. त्यामुळे त्यांना बीडच्या कारवाईकडे येता आले नाही. बुधवारी सकाळी येऊन ते कारवाई करतील, असे सहायक आयुक्त अभिमन्यू केरूरे यांनी सांगितले.
शप्पूवर झाला
होता गोळीबार
साधारण तीन महिन्यांपूर्वी क्रिकेट खेळून घरी जात असताना शप्पूवर गोळीबार झाला होता. सुदैवाने यामध्ये तो बालंबाल बचावला होता. हा हल्ला गुटख्याच्या वादातूनच झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. मंगळवारी सापडलेल्या गुटखा साठ्यावरून याला दुजोरा मिळाल्याने खळबळ उडाली आहे.
राजकीय पुढाºयांचा होता पोलिसांवर दबाव
शप्पूवर हल्ला झाल्यानंतर हल्लेखोरांना अटक करा, या मागणीसाठी काही राजकीय पुढाºयांनी पोलिसांना चांगलेच परेशान केले होते. त्यानंतरही काही पुढाºयांनी पत्रकबाजी करून हल्लेखोरांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. आता शप्पूच्या घरी गुटखा सापडल्याने पत्रकबाजी करणाºया राजकीय व्यक्तींचा त्याला पाठबळ आहे का? याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. त्याला अनेक बड्या पुढाºयांचे पाठबळ असल्याची चर्चा ऐकावयास मिळत असून पोलीस तपासानंतरच त्यांची नावे समोर येण्याची शक्यता आहे.
घरावर सीसीटीव्हीचा वॉच
शप्पूच्या घरावर चोहोबाजूंनी सीसीटीव्ही कॅमेरे बसविलेले आहेत. त्यामुळे घरात कधी गुटखा आला, कधी गेला, कोणी नेला, या सर्व गोष्टी टिपल्या असल्याची शक्यता आहे. हे सर्व फुटेज ताब्यात घेतली जाणार असल्याचे पाळवदे यांनी सांगितले.