बीडची जिल्हा क्रीडा अधिकारी, शिपाई एसीबीच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 08:28 PM2018-04-03T20:28:00+5:302018-04-03T20:28:00+5:30
व्यायामशाळासाठी मंजूर झालेले तीन लाख रुपयांचे अनुदान बँक खात्यावर टाकण्यासाठी ८० हजार रुपयांची लाच घेताना बीडची जिल्हा क्रीडा अधिकारी नंदा खुरपुडे व शिपाई शेख फईमोद्दिन याला आज दुपारी रंगेहाथ पकडण्यात आले.
बीड : व्यायामशाळासाठी मंजूर झालेले तीन लाख रुपयांचे अनुदान बँक खात्यावर टाकण्यासाठी ८० हजार रुपयांची लाच घेताना बीडची जिल्हा क्रीडा अधिकारी नंदा खुरपुडे व शिपाई शेख फईमोद्दिन याला आज दुपारी रंगेहाथ पकडण्यात आले. जिल्हा क्रीडा कार्यालयातच दुपारी ही कारवाई झाली. कारवाईनंतर खुरपुडे हिच्या लातूर येथील घराची झडती घेण्यात आली असून रात्रीपर्यंत तपासणी सुरूच असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
गेवराई तालुक्यातील ब-हाणपुर येथे तक्रारदाराची मावलाई युवक क्रीडा मंडळ व व्यायामशाळा नावाची संस्था आहे. याच संस्थेस २०१७-१८ या वर्षात नवीन व्यायामशाळेचे बांधकाम करण्यासाठी जिल्हा क्रीडा कार्यालयाकडून मंजुरी मिळाली होती. तक्रारदारासोबतच इतर सहा लोकांचाही यामध्ये समावेश होता. या सर्वांसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी नंदा खुरपुडे हिने प्रत्येकी तीन लाख रुपयांचा पहिला हप्ता मंजुर केला होता. हा हप्ता घेण्यासाठी तक्रारदार खुरपुडेकडे गेले. यावेळी खुरपुडे व शिपाई शेख फईमोद्दिन यांनी तक्रारदारासह इतर सहा लोकांकडे तीन लाख रुपयांचा अनुदान बँक खात्यावर जमा करण्यासाठी दोन लाख रुपयांची मागणी केली. त्यानंतर तक्रारदाराने तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक कक्ष गाठून खुरपुडे व शेख विरोधात तक्रार दिली.
त्याप्रमाणे एसबीने कार्यालय व इतर ठिकाणी वारंवार सापळा लावला. परंतु ते सापडले नाहीत. अखेर मंगळवारी दुपारी क्रीडा कार्यालयातच दोन लाख रुपयांपैकी ८० हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीने झडप घालत त्यांना बेड्या ठोकल्या. याप्रकरणी दोघांविरोधातही बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ.श्रीकांत परोपकारी, अपर पोलीस अधीक्षक जिरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक बाळकृष्ण हनपुडे, कर्मचारी दादासाहेब केदार, विकास मुंडे, प्रदीप वीर, राकेश ठाकूर, अमोल बागलाने, चालक मेहेत्रे यांनी केली.
धुळ्यातही झाली होती कारवाई
नंदा खुरपुडे हिच्यावर धुळे येथे असतानाही लाच घेताना एसीबीने कारवाई झाली होती, असे एसीबीच्या सुत्रांनी सांगितले. तिला निलंबितही केले होते. त्यानंतर ती बीडच्या कार्यालयात जिल्हा क्रीडा अधिकारी या पदावर रुजू झाले. येथेही तिने लाच मागितली आणि एसीबीच्या जाळ्यात अडकली.