दशक्रिया विधीसाठी गेलेल्या तरूणाचा गोदावरीत बुडून मृत्यु, 24 तासानंतर मृतदेह सापडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 03:57 PM2017-10-26T15:57:20+5:302017-10-26T15:58:43+5:30
विधीनंतर नदीच्या पाण्यात अंघोळ करतांना भास्कर नदीत बुडाला. यावेळी त्याचा शोध न लागल्याने तात्काळ औरंगाबाद येथील जलतरण अतिदक्षता पथकास पाचारण करण्यात आले होते.
माजलगाव ( बीड ) : गव्हाणथडी येथील तरूण भास्कर रामचंद्र चौरे (वय 23 वर्षे) व काही नातेवाईक दशक्रिया विधीसाठी बुधवारी (दि. २५) गोदावरी नदीवर आले होते. विधीनंतर नदीच्या पाण्यात अंघोळ करतांना भास्कर नदीत बुडाला. यावेळी त्याचा शोध न लागल्याने तात्काळ औरंगाबाद येथील जलतरण अतिदक्षता पथकास पाचारण करण्यात आले होते. शेवटी आज सकाळी 11.30 वाजेच्या दरम्यान या पथकाला त्याचा मृतदेह शोधण्यास यश आले.
माजलगाव तालुक्यातील गव्हाणथडी येथील रहिवाशी भास्कर चौरे हा नातेवाईकाच्या दशक्रिया विधीसाठी बुधवारी सकाळी १० च्या दरम्यान गोदावरी नदीवर आला होता. विधीनंतर स्नान करण्यासाठी पाण्यात उतरले असता तो अचानक पाण्यात बुडाला. यावेळी ग्रामस्थांनी भास्कर याचा पाण्यात शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याचा शोध लागला नाही. यामुळे आज औरंगाबाद येथील जलतरण अतिदक्षता पथकास पाचारण करण्यात आले.
या पथकाने गोदावरी पात्रात शोधा-शोध करून सकाळी 11.30 वाजता. भास्कर याचा मृतदेह शोधून काढला. अकस्मातपणे झालेल्या या मृत्युमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. भास्कर याच्या पश्चात एक भाऊ, आई-वडिल असा परिवार आहे.