माजलगावात उस दराबाबत शेतकरी आक्रमक; राष्ट्रीय महामार्ग क्र. २२२ धरला रोखून
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2017 04:42 PM2017-11-24T16:42:23+5:302017-11-24T16:58:47+5:30
पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर उसाचा दर द्या, २६५ जातीच्या उसाची नोंद घ्यावी या व इतर मागण्यासाठी मागील काही दिवसांपासून तालुक्यात शेतक-यांचे आंदोलन सुरु आहे. आज या आंदोलनाला हिंसक वळण प्राप्त होऊन शेतक-यांनी परभणी फाटा येथे जाळपोळ करत राष्ट्रीय महामार्ग २२२ वरील वाहतूक रोखून धरली.
माजलगाव (बीड ) : पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर उसाचा दर द्या, २६५ जातीच्या उसाची नोंद घ्यावी या व इतर मागण्यासाठी मागील काही दिवसांपासून तालुक्यात शेतक-यांचे आंदोलन सुरु आहे. आज या आंदोलनाला हिंसक वळण प्राप्त होऊन शेतक-यांनी परभणी फाटा येथे जाळपोळ करत राष्ट्रीय महामार्ग २२२ वरील वाहतूक रोखून धरली.
सध्या राज्यात सर्वत्र शेतक-यांचे उस दराबाबत आंदोलन सुरु आहेत. तालुक्यात देखील शिवसेने सोबतच शेतकरी संघटना देखील वेगवेगळया आंदोलनांद्वारे साखर कारखानदारांवर दबाव आणत आहेत. मात्र, कारखानदारांचे याकडे सपशेल दुर्लक्ष होत असल्याने आता शेतकरी अधिक आक्रमक होऊन आंदोलन करत आहेत. आज सकाळी शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष गंगाभिषण थावरे यांच्या नेतृत्वाखाली परभणी फाटा येथे रस्त्यावर जाळपोळ करत शेतक-यांनी संताप व्यक्त केला. यामुळे राष्ट्रीय महामार्ग २२२ वरील वाहतूक काही काल ठप्प होती.
काय आहेत मागण्या
तालुक्यात साखर कारखानदारांनी बैठक घेउन उसाचा समानदर देउन 265 जातीचे उसाची नोंद न घेणे तसेच उसाचा दर हंगाम सुरु होवून देखील जाहिर न करणे असे आडमुठे धोरण अवलंबिले आहे. यामुळे हे आंदोलन पेटले असून शेतक-यांनी सहकारी साखर कारखान्यांनी खाजगी साखर कारखान्यापेक्षा गतवर्षी प्रतिटन सहाशे रूपये कमी रक्कम दिली हि रक्कम तात्काळ द्यावी, उसाचा दर तात्काळ जाहिर करावा तसेच 265 याय जातीच्या उसाची नोंद कारखान्यांना घ्यावी अशा मागण्या केल्या.