परळीत वैद्यनाथ साखर कारखान्यात रसाची टाकी फुटली; १ ठार ११ कर्मचारी भाजले; ७ जणांची प्रकृती चिंताजनक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2017 01:26 AM2017-12-09T01:26:28+5:302017-12-09T01:28:32+5:30

परळी (जि. बीड) तालुक्यातील पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यातील उसाच्या गरम रसाच्या टाकीचा कॅप शुक्रवारी दुपारी गळून पडला. त्यामुळे टाकीतील गरम रस तेथील कामगार व कर्मचा-यांच्या अंगावर पडला. त्यात बारा जण भाजले. यातील एकाचा रात्री १२.३० वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर ७ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

 Fossil tank broke out in Vaidyanath sugar factory in Parli; 1 killed 11 employees burnt; 7 people are worried | परळीत वैद्यनाथ साखर कारखान्यात रसाची टाकी फुटली; १ ठार ११ कर्मचारी भाजले; ७ जणांची प्रकृती चिंताजनक

परळीत वैद्यनाथ साखर कारखान्यात रसाची टाकी फुटली; १ ठार ११ कर्मचारी भाजले; ७ जणांची प्रकृती चिंताजनक

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परळी (जि. बीड) : तालुक्यातील पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यातील उसाच्या गरम रसाच्या टाकीचा कॅप शुक्रवारी दुपारी गळून पडला. त्यामुळे टाकीतील गरम रस तेथील कामगार व कर्मचा-यांच्या अंगावर पडला. त्यात बारा जण भाजले. यातील एकाचा रात्री १२.३० वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर ७ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ९ जणांवर लातुरात तर दोघांवर अंबाजोगाईत उपचार सुरु आहेत.

परळी-बीड राज्य रस्त्यावर पांगरी शिवारात अठरा वर्षांपूर्वी लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी या साखर कारखान्याची उभारणी केली. सध्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे या कारखान्याच्या अध्यक्षा गेल्या हंगामात हा कारखाना उसाअभावी बंद होता. यंदा काही दिवसांपूर्वीच ऊस गाळपास प्रारंभ झाला होता. शुक्रवारी दुपारी पावणेतीनच्या सुमारास कारखान्यातील उसाच्या रसाने भरलेल्या टाकीचे कॅप गळून पडले. साखर प्रक्रियेसाठी हा रस दुसºया टाकीत नेण्यापूर्वीच गरम रसाची ही टाकी फुटल्याने कर्मचाºयांच्या अंगावर उकळलेला रस पडला. त्यामुळे एकच हाहाकार उडाला. तेथील प्रत्येकजण मदतीसाठी धावून जात होते.

यात कारखान्याचे काही कर्मचारी व खाजगी कंत्राटदाराचे काही कामगार जखमी झाले. हा रस ४०० डिग्री सेल्सिअस इतका उष्ण होता, अशी माहिती आहे. मधुकर पंढरीनाथ आदनाक (५०) यांचा रात्री उशिरा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर गौतम तुकाराम घुमरे (५०), सुभाष गोपीनाथ कराड (४५), सुमित अनंतराव भंडारे (१८) हे १०० टक्के भाजले असून सुनील भागवत भंडारे (२४) ९५ टक्के, रामभाऊ माणिक नागरगोजे (४२) ९० टक्के, लहुदास अभिमान डाके (२५) ६३ टक्के व धनाजी राजेश्वर देशमुख (४५) हे ६० टक्के भाजले आहेत. याशिवाय आणखी दोघांवर लातुरात उपचार सुरू असल्याचे डॉ. विठ्ठल लहाने यांनी सांगितले.

उर्वरित दोघे किरकोळ जखमी असून त्यांच्यावर अंबाजोगाईत उपचार सुरु आहेत. वृत्त लिहीस्तोवर या चौघांमधील चंद्रकांत मिसाळ आणि अदिनाथ भंडारी या दोघांचीच नावे समजू शकली. या घटनेनंतर कारखान्यातील सर्व प्रक्रि या बंद ठेवण्यात आली.
जखमींना वैद्यनाथ कारखान्याचे उपाध्यक्ष नामदेवराव अघाव, कार्यकारी संचालक व्ही.जी.दगडे, येवले, पानढवळे, सुरक्षा अधिकारी डी.एल.जायभाये यांच्यासह इतर कर्मचाºयांनी तातडीने परळीच्या खाजगी रुग्णालय व अंबाजोगाईच्या स्वा.रा.ती रुग्णालयात दाखल केले. तेथून लातूर येथील डॉ. विठ्ठल लहाने यांच्या दवाखान्यात आधी आठ जणांना व नंतर रात्री आणखी दोघांंना हलविण्यात आले. या घटनेबद्दल राज्याच्या ग्रामविकास मंत्री व वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षा पंकजा मुंडे यांनी दु:ख व्यक्त केले असून शनिवारी जखमींची त्या भेट घेणार आहेत.

घटनास्थळास अंबाजोगाईचे उपविभागीय अधिकारी विशाल आनंद, प्रशिक्षणार्थी उपविभागीय अधिकारी अनुराधा गुरव, परळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक के.जे.सपकाळ, जमादार नवनाथ ढाकणे, विष्णू घुले यांनी भेट देऊन पाहणी केली.




‘डीप बर्न’मुळे चिंता
सुपर फेशिअल आणि डीप बर्न असे जळित रुग्णांचे वर्गीकरण केले जाते. अतिउष्ण पाण्यात १२ पैकी १० जण मोठ्या प्रमाणावर भाजले गेले. मानवी कातडीचे मुख्यत: दोन तर सूक्ष्म पातळीवर एकूण सात पडदे असतात. या गंभीर घटनेत संपूर्ण कातडी भाजली गेली आहे. त्याला फुल थिकनेस बर्न म्हणतात. परिणामी, सर्व रुग्णांची प्रकृती ही चिंताजनकच आहे.
-डॉ. विठ्ठल लहाने,
प्लास्टिक सर्जन, लातूर

 



उपचारासाठी शर्थीचे प्रयत्न करा -धनंजय मुंडे
जखमी कामगारांना तातडीने चांगल्यात चांगले उपचार मिळावेत आणि त्यांचे जीव वाचावेत, यासाठी प्रशासन, कारखान्याने प्रयत्न करावेत अशा सूचना विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केल्या आहेत. घटना समजताच वर्धा दौºयावर असलेल्या धनंजय यांनी रुग्णालयातील डॉक्टरांशी संपर्क केला व रुग्णाच्या प्रकृतीची विचारपूस केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना त्यांनी तातडीने जखमीना मदत करण्याच्या सूचना दिल्याने जि.प.सदस्य अजय मुंडे, शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, गटनेते वाल्मिक कराड, सभापती सूर्यभान मुंडे व इतरांनी रूग्णालयात धाव घेतली व मदत कार्यात सहभाग घेतला. ही घटना अतिशय दुर्दैवी व गंभीर आहे. या घटनेस जबाबदार कोण? घटना कशी घडली? याची चर्चा नंतर करता येईल. आता मात्र जखमींना बरे करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. या जखमींवर आवश्यकता असल्यास मोठ्या शहरातील चांगल्या रूग्णालयात उपचार करावेत, असे मुंडे म्हणाले.

Web Title:  Fossil tank broke out in Vaidyanath sugar factory in Parli; 1 killed 11 employees burnt; 7 people are worried

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.