Ganpati Festival : परळीत गणरायाच्या शानदार मिरवणुकीने झाली गणेशोत्सवास सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 01:22 PM2018-09-13T13:22:22+5:302018-09-13T13:40:47+5:30
सकाळी ९ वाजता मोंढ्यातून गणरायांच्या मूर्तीची वाजतगाजत मिरवणूक निघाली
परळी (बीड ) : परळी शहर व परिसरात गुरूवारी श्री गणरायांचे उत्साहात भक्तांनी वाजत गाजत स्वागत केले. शहरातील मोंढा मार्केट परिसरात गणरायांच्या मुर्तीची खरेदी करण्यासाठी सकाळपासूनच सार्वजनिक गणेश मंडळ पदाधिकारी व भक्तांची झुंबड उडाली होती. या ठिकाणाहून श्री गणरायांच्या मुर्तीची भव्यदिव्य वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. यानंतर मूर्तींची सार्वजनिक ठिकाणी व घरोघरी प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी सर्व भक्तांमध्ये गणरायांच्या आगमनाने उत्साह संचारला होता. गणपती बप्पा की जय असा जयघोष करत स्वागताच्या मिरवणूका निघाल्या.
मोंढा मार्केटमध्ये यंदा मोठ्या प्रमाणात गणरायांच्या लक्षवेधक मूर्ती उपलब्ध आहेत. येथील वैद्यनाथ मंदिर ट्रस्ट, वैजनाथाचा राजा सार्वजनिक गणेश मंडळ, पुरोहित व व्यापारी यांनी सार्वजनिक गणेश उत्सव-2018 चे आयोजन केले आहे. आज सकाळी ९ वाजता मोंढ्यातून गणरायांच्या मूर्तीची वाजतगाजत मिरवणूक निघाली आणि सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात झाली. मिरवणुकीत पारंपारीक वाद्य, लेझिम, ढोल, संबळ पथक सहभागी होते. मिरवणूक मोंढा, टॉवर, गणेशपार रोडवर, आंबे वेस, देशमुख पार, वैद्यनाथ गल्लीमार्गे वैद्यनाथ मंदिरात पोहोंचली. यानंतर मूर्तीची प्रतिष्ठापणा करण्यात आली.
सकाळी 9.30 च्या सुमारास वैद्यनाथ मंदिर ट्रस्टच्या श्री वैजनाथाचा राजा सार्वजनिक गणेश मंडळाने भव्यदिव्य गणरायांची मिरवणूक काढण्यात आली. विशेष म्हणजे या मिरवणूकीत गुलाल वापरण्यात आला नाही. गणरायांच्या मुर्तीवर फुलांची उधळण करण्यात आली. मिरवणुकीत वैद्यनाथ मंदिर ट्रस्टचे सचिव राजेश देशमुख, गणेश मंडळाचे अध्यक्ष नितीन राजूरकर, सुरेश टाक, राजू तीळकरी, कुमार जोशी , राजाभाऊ जोशी, प्रकाश जोशी, योगेश स्वामी, शिरीष स्वामी, नागनाथ पवार, पिंटू बुद्रे आदींचा सहभागी होते. बच्चे कंपनीनेही रिक्षातून गणरायांची मुर्तींची मिरवणूक काढली.
चाळीस गावात एक गाव एक गणपती
परळी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 24 तर संभाजी नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शहरात 20 सार्वजनिक गणेश मंडळांनी श्रींची स्थापना दुपारपर्यंत केली.परळी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 40 गावांत एक गाव एक गणपती संकल्पना राबविण्यात आली आहे. अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक मारोती शेळके यांनी दिली.