प्रसिद्धीसाठी वाट्टेल ते ! फंड नसतानाही प्रसिद्धीत राहण्यासाठी पंचायत समिती सदस्यांचा नवा ' फंडा'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 02:48 PM2017-10-26T14:48:28+5:302017-10-26T14:52:59+5:30
शासन नियमानुसार पंचायत समिती सदस्यांना कोणताच वैयक्तिक विकास फंड नसतो. परंतु; आपल्या कार्यक्षेत्रात आपणच फंड आणून विविध विकास कामांसोबतच इतर अनेक कामे करून त्यावर स्वत:चे नाव टाकून केवळ जाहिरातबाजी करण्याचा नवीन फंडा पंचायत समिती सदस्यांनी आणला आहे.
कडा ( बीड ) : शासन नियमानुसार पंचायत समिती सदस्यांना कोणताच वैयक्तिक विकास फंड नसतो. परंतु; आपल्या कार्यक्षेत्रात आपणच फंड आणून विविध विकास कामांसोबतच इतर अनेक कामे करून त्यावर स्वत:चे नाव टाकून केवळ जाहिरातबाजी करण्याचा नवीन फंडा पंचायत समिती सदस्यांनी आणला आहे. फंड नसताना हा ' फंडा ' कशासाठी हेच जनतेला कळेनासे झाले आहे. शासनाच्या पैशावर आपले नाव वापरणा-या पंचायत समिती सदस्यांवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
आष्टी तालुक्यातील पंचायत समिती अंतर्गत चौदा पंचायत समिती सदस्य येतात. गणाचा विकास करण्यासाठी पंचायत समितीच्या सभागृहात बैठक घेऊन मंजूर असलेला निधी कोठे, कशा प्रकारे खर्च करायचा असे या सदस्यांनी सुचवावे आणि त्या गावात त्या निधीचा विनियोग करावा अशी पद्धत आहे. मात्र, काही सदस्यांना विकास कामाचे सोडा, पण आपल्या गणासाठी काय आले, हेच उमगत नाही मग जनतेला काय कळणार ? असे असताना काही सुशिक्षित महाभाग सदस्यांनी नवीन फंडा चालवला आहे.
कोणताच आणि कसलाच वैयक्तिक फंड नसताना केवळ आपल्या नावाची चर्चा होण्यासाठी उभारलेले हायमास्ट दिवे, प्रवासी निवारे व इतर ठिंकाणी मार्गदर्शक नेत्यांसह स्वत:चा फोटो लावून अमूकतमुक पं. स. सदस्यांच्या फंडातून असा स्पष्ट नामोल्लेख पहायला मिळत आहे. हा खटाटोप प्रसिद्धीसाठी की राजकारणातील विकासासाठी हेच कळत नाही.
तात्काळ नावे काढावीत
शासनाच्या पैशावर उभारलेल्या कामावर नामोल्लेख असणा-या सदस्यांवर कारवाई करावी. तात्काळ ती नावे काढून टाकावीत नसता पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी किसान सेलचे आष्टी तालुकाध्य्क्ष दादासाहेब गव्हाणे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
योजनेचा उल्लेख चालतो, सदस्याचा नाही
ज्या योजनेतून काम केले आहे त्याचे नाव टाकता येते. मात्र, स्वत:च्या नावाचा उल्लेख करता येत नाही. याची पाहणी करून योग्य कारवाई करण्यात येईल.
- आप्पासाहेब सरगर, गटविकास अधिकारी, पं.स.आष्टी