जयदत्त क्षीरसागर पुन्हा गैरहजर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 11:30 PM2019-03-14T23:30:43+5:302019-03-14T23:31:35+5:30
पवारांनी (अजित) संदीप क्षीरसागर यांना जवळ केल्याने क्षीरसागर बंधू राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापासून गेली पाच वर्षे दूर राहिले.
सतीश जोशी
बीड : बीड लोकसभा मतदार संघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार निवडीसाठी मुंबईत शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षश्रेष्ठींची बैठक झाली. या अतिमहत्त्वाच्या बैठकीस पक्षाचे विधीमंडळातील उपनेते आ. जयदत्त क्षीरसागर हे अनुपस्थित राहिल्यामुळे जिल्ह्यात चर्चेला उधाण आले आहे. पक्षाच्या पहिल्या यादीत बीडचा उमेदवार जाहीर झाला नसला तरी माजी आ.अमरसिंह पंडित आणि जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे या दोनच नावावर चर्चा झाली. अमरसिंह पंडितांच्याच नावावर या बैठकीत अधिक जोर होता.
या बैठकीस माजी मंत्री प्रकाश सोळंके, माजी आ. अमरसिंह पंडित, जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे, अक्षय मुंदडा, संदीप क्षीरसागर उपस्थित होते. या बैठकीत बीड लोकसभेसाठी संभाव्य उमेदवारासंदर्भात चर्चा झाली. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी सकाळी ११ वा. ही बैठक झाली होती. गेवराईचे माजी आ. अमरसिंह पंडित आणि बजरंग सोनवणे यांच्या उमेदवारीसंदर्भात चर्चा झाली असली तरी अमरसिंह पंडित हेच प्रबळ उमेदवार ठरू शकतात, असा चर्चेचा सूर होता. दोनच नावे चर्चेला आल्यामुळे सायंकाळी जाहीर होणाऱ्या पहिल्या यादीत बीडचा उमेदवार असेल, असे वाटत होते. परंतु पक्षाच्या पहिल्या यादीतील ११ उमेदवारांत बीडचे नाव नव्हते. येत्या काही तासात जाहीर होणाऱ्या दुस-या यादीत मात्र बीडचा उमेदवार जाहीर होईल, असे वाटत आहे.
संभाव्य उमेदवारांमध्ये पक्षाचे उपनेते जयदत्त क्षीरसागर, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, अमरसिंह पंडित या नावांची प्रमुख चर्चा होती. परंतु जयदत्त क्षीरसागरांनी लोकसभा लढविण्यास यापूर्वीच स्पष्ट नकार दिला होता. विशेष म्हणजे आजच्या बैठकीसही ते अनुपस्थित राहिले. धनंजय मुंडे हे पक्षाचे प्रमुख स्टार प्रचारक असल्यामुळे त्यांना जिल्ह्यातच अडकून ठेवणे पक्षाला कदाचित उचित वाटले नसावे. विशेष म्हणजे उमेदवारीसाठी धनंजय मुंडे यांनीही फारसा उत्साह दाखविला नाही. आता एकमेव नाव अमरसिंह पंडित यांचेच उरले आहे.
महिनाभरापासून बीडचे राकाँ जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांचेही नाव चर्चेत आले आहे. त्यांनी लोकसभेचा संभाव्य उमेदवार या थाटात मतदारांशी संपर्कही वाढविला आहे. परंतु कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या मते भाजपच्या उमेदवारास अमरसिंह पंडित हेच तुल्यबळ लढत देऊ शकतात, अशी चर्चा बारामतीपर्यंत पोहचली. पंडित यांच्याकडे राजकीय वारसा आहे. साखर कारखाना, शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून तगडी यंत्रणा आहे. निवडणूक लढविण्यासाठी जे डावपेच, यंत्रणा राबवावी लागते ते सर्व काही त्यांच्याकडे आहे. या बैठकीत केवळ दोन नावावरच चर्चा झाली असतानाही पहिल्या यादीत नाव जाहीर न झाल्यामुळे शरद पवार आणि पक्षश्रेष्ठीच्या मनात ही लढत तूल्यबळ होण्यासाठी काही विचार आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
बीड जिल्ह्यात संकल्प, निर्धार समारोप आदी कार्यक्रमाच्या निमित्ताने अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ ते शरद पवारांपर्यंत पक्षाची ज्येष्ठ-श्रेष्ठ मंडळी येऊन गेली. परंतु जाहीर सभेत पक्षाचा कोण उमेदवार असेल? याचा थांगपत्ता त्यांनी अजूनही लागू दिला नाही. निवडणूक जाहीर होऊन आज पाच दिवस झाले तरीही राकाँ उमेदवार जाहीर होत नाही, याबद्दल आश्चर्य आहे.
राजश्री मुंडे यांच्या नावाचीही चर्चा
आजच्या या बैठकीत अमरसिंह पंडित आणि बजरंग सोनवणे या दोन नावांवरच उघडउघड चर्चा झाली असली तरी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजश्री मुंडे यांचे नावही दबक्या आवाजात पुढे आले होते. ओबीसी चेहरा आणि महिला असल्यामुळे ही लढत आगळीवेगळी आणि तूल्यबळ ठरू शकेल, अशी चर्चाही बैठकीबाहेर पक्षश्रेष्ठींच्या कानावर घातली, असे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. असे असले तरी धनंजय मुंडे यांनी मात्र यात काहीच स्वारस्य दाखविले नाही.
काका-पुतण्यातील वाद
क्षीरसागर घराण्यात आ. जयदत्त क्षीरसागर, बीड नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर आणि पुतण्या संदीप क्षीरसागर, उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर यांच्यातील वाद जिल्ह्यात चर्चेत आहे. पवारांनी (अजित) संदीप क्षीरसागर यांना जवळ केल्याने क्षीरसागर बंधू राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापासून गेली पाच वर्षे दूर राहिले. जिल्ह्यात ते पक्षीय कार्यक्रमात सक्रिय नसले तरी जिल्ह्याबाहेरील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यक्रमांना ते उपस्थित रहात असत. बीड शहरात झालेल्या विजयी संकल्प मेळाव्यास शरद पवार आले होते. यावेळी ते उपस्थित होते.
बीडच्या कार्यक्रमास उपस्थित राहून त्यांनी विरोधकांची चर्चा बंद केली. ते या मेळाव्यापासून पुन्हा पक्षात सक्रिय राहतील, असे वाटत असतानाच परळी येथील निर्धार मेळाव्याच्या समारोप कार्यक्रमास शरद पवार आले असतानाही त्यांनी त्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. पक्षाचा लोकसभेसाठी उमेदवार निवडीसाठी मुंबईत महत्वाची बैठक होत असताना या बैठकीसही जयदत्त क्षीरसागर उपस्थित न राहिल्यामुळे पुन्हा त्यांच्या भूमिकेबद्दल चर्चा सुरू झाली आहे. याउलट त्यांचे पुतणे संदीप क्षीरसागर लोकांचे प्रश्न हाताळत तेवढ्याच जोमाने सक्रिय झाले आहेत. बीड वळण रस्त्यावरील सर्व्हिस रोड आणि शेतक-यांच्या मावेजाच्या प्रश्नावर त्यांनी रस्ता रोको आंदोलन करुन जिल्ह्याचे लक्ष वेधले. मुंबईत झालेल्या बैठकीसही ते आवर्जून उपस्थित होते.