अवघ्या २२ तासांत ‘ती’ पुन्हा अनाथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2018 12:38 AM2018-06-03T00:38:26+5:302018-06-03T00:39:39+5:30

जन्मत:च सुरू झालेला ‘ती’चा संघर्ष संपण्याचे नाव घेत नाही. बाळ बदल झाल्याच्या संशयातून आधी आई-वडीलांनीच नाकारले. डीएनए अहवालानंतर तब्बल १२ दिवसांनी तीला स्वीकारले. नंतर दुसऱ्याच दिवशी आम्ही सांभाळण्यास असमर्थ आहोत, असे सांगत आई-बापानेच ‘ती’ला पुन्हा अनाथ केले. शनिवारी तिला औरंगाबदेतील अनाथालयात दाखल करण्यात आले.

In just 22 hours, she 'orphaned' again | अवघ्या २२ तासांत ‘ती’ पुन्हा अनाथ

अवघ्या २२ तासांत ‘ती’ पुन्हा अनाथ

Next
ठळक मुद्देआई-वडील सांभाळण्यास असमर्थ ; बीड जिल्ह्यातील मुल अदलाबदल प्रकरण

बीड : जन्मत:च सुरू झालेला ‘ती’चा संघर्ष संपण्याचे नाव घेत नाही. बाळ बदल झाल्याच्या संशयातून आधी आई-वडीलांनीच नाकारले. डीएनए अहवालानंतर तब्बल १२ दिवसांनी तीला स्वीकारले. नंतर दुसऱ्याच दिवशी आम्ही सांभाळण्यास असमर्थ आहोत, असे सांगत आई-बापानेच ‘ती’ला पुन्हा अनाथ केले. शनिवारी तिला औरंगाबदेतील अनाथालयात दाखल करण्यात आले.

छाया राजू थिटे (रा. भंडारी, ता. सेनगाव, जि. हिंगोली, ह.मु. कुप्पा ता.वडवणी, जि. बीड) या महिलेने ११ मे रोजी सायंकाळी ४.४५ वाजता या चिमुकलीला जन्म दिला. त्याची नोंद प्रसुती विभागात चुकून मुलगा अशी केली. वजन कमी असल्याने बाळाला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. येथील डॉक्टरांनी त्याला इतरत्र हलविण्याचा सल्ला दिला. त्यानुसार एका खाजगी रूग्णालयात दाखल केले गेले. १० दिवस उपचार केल्यानंतर २१ मे रोजी बाळाला आईच्या स्वाधीन केले. परंतु, मुलगा नसून तीे मुलगी असल्याचे समजताच आईने स्वीकारण्यास नकार दिला. त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले.

पोलिसांनी बाळाचे व थिटे दाम्पत्याचे रक्त घेऊन डीएनए तपासणीसाठी पाठविले. त्याचा अहवाल प्राप्त होताच ते बाळ थिटे यांचेच असल्याचे स्पष्ट झाले. जिल्हा रुग्णालयातील परिचारिका व डॉक्टरांच्या लिहिण्यातील चुकीमुळे हा गोंधळ उडाल्याचे तपासातून समोर आले. तब्बल १२ दिवस आईच्या दूधापासून दुरावलेले हे बाळ शुक्रवारी दुपारी थिटे दाम्पत्याच्या स्वाधीन करण्यात आले. रात्रभर त्याचा सांभाळ केल्यानंतर शनिवारी सकाळी १० वाजता या दाम्पत्याने बाळाला सांभाळण्यास आपण असमर्थ असल्याचा जबाब बालकल्याण समितीसमोर दिला. समितीचे अध्यक्ष डॉ.अभय वणवे, सदस्य तत्वशील कांबळे, सुनिल बळवंते यांनी त्यांचे समुपदेशन केले. मोठ्या प्रयत्नानंतरही बाळ स्वीकारण्यास त्यांनी नकार दिला. अखेर बाळाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने समितीने त्या बाळाला सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून शनिवारी दुपारी १२ वाजता औरंगाबादच्या बीजेएस शिशुगृहात पाठविले.

एका चुकीमुळे ‘ती’चे हाल
जिल्हा रुग्णालयातील परिचारीका व डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मुलगी ऐवजी मुलगा असे लिहिण्यात आले. त्यानंतर थिटे दाम्पत्याच्या हाती मुलगी सोपविली गेली. आपल्याला मुलगा झाला होता, मुलगी नाही, अशा समजूतीने त्यांनी बाळास स्वीकारण्यास नकार दिला. डीएनए अहवालानंतर हे बाळ आपलेच असल्याचे उघड होऊनही त्यांनी ‘ती’ला नाकारले. दोषी डॉक्टर व परिचारिकांमुळेच या चिमुकलीच्या नशिबी अनाथाचे जीवन आले.

थिटे यांना पहिली मुलगीच
छाया राजू थिटे यांना अडीच वर्षांची एक मुलगी आहे. मजुरीसाठी हे दाम्पत्य हिंगोलीहून बीडला आलेले आहे. आधीही मुलगीच आणि आताही मुलगीच झाल्याने त्यांनी बाळ स्वीकारण्यास नकार दिल्याची चर्चा दिवसभर शहरात होती. माहिती घेतली असता त्यांनी आपला डीएनएवर विश्वास नाही. आम्हाला मुलगाच झाला होता, यावर थिटे दाम्पत्य ठाम असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. यासंदर्भात राजू थिटे यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता मी कामात व्यस्त आहे असे सांगून त्यांनी बोलण्यास नकार दिला.


थिटे दाम्पत्याने मुलगी सांभाळण्यास असमर्थ असल्याचे आम्हाला सांगितले. तरीही आम्ही त्यांचे समुपदेशन करून मुलगी सांभाळण्यासाठी मनपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी ऐकले नाही. अखेर सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून थिटे यांच्या परवानगीने तिला औरंगाबादच्या शिशुगृहात पाठविले आहे.
तत्वशील कांबळे
सदस्य, बालकल्याण समिती, बीड

थिटे दाम्पत्य सांभाळण्यास तयार होते, म्हणूनच आम्ही शुक्रवारी ‘तीला’ त्यांच्या स्वाधीन केले. ते बाळाला घरीही घेऊन गेले होते. आमच्याकडील कारवाई पूर्ण झाली आहे. आता पुढे आमचा संबंध नाही.
- सय्यद सुलेमान
पोलीस निरीक्षक, शहर पोलीस ठाणे, बीड

परक्याचे मुल सांभाळायचे कसे?
आमच्या भावाने व भावजयीने मुलगा झाल्याचे स्वत:च्या डोळ्यांनी पाहिले आहे. डीएनए हा आमच्या डोक्याच्या पलिकडचा विषय असून परक्याचे लेकरु आम्ही कसे स्वीकारू? उद्या समाज काय म्हणेल? असा प्रश्न भंडारी येथील संदीप थिटे व त्यांच्या कुटुंबियांना पडला आहे. बीड येथील सामान्य रुग्णालयात प्रसुती झालेली छाया राजू थिटे ही महिला मूळची सेनगाव तालुक्यातील भंडारीची रहिवासी.

पती राजू थिटे व त्यांची पत्नी छाया हे सालगडी म्हणून बीड जिल्ह्यात कामाला गेले आहेत. थिटे यांच्या घरी आई-वडील, एक भाऊ, भावजय असा परिवार आहे. घरी शेतजमीन नसल्याने कायम रोजगाराच्या शोधात थिटे कुटुंबातील दोघे भाऊ बाहेर राहतात. राजूने झाला प्रकार घरी सांगितला आहे. आई चतुराबाई ही आजारी असून अंथरुणाला खिळल्याने थिटे कुटुंबातील कोणलाही बीडला जाता आले नाही.

घरची परिस्थिती हलाखीची आहे. अशा परिस्थितीत आमच्या नशिबी हे काय आले, अशी भावना राजू थिटे यांचे वडील दगडू थिटे यांनी व्यक्त केली. बीड येथील रुग्णालयात आमच्या भावजयीला मुलगाच झाला आहे. त्यांनी त्यांंच्या डोळ्यांनी पाहिले आहे. त्यामुळे दुसऱ्याचे लेकरु स्वीकार करण्यासाठी मन धाडस करीत नाही. डीएनएवर आमचा विश्वास नाही. उद्या समाज काय म्हणेल, हाही प्रश्न आहे. त्यामुळे ते बाळ अनाथ आश्रमात सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचे राजू थिटेचा भाऊ संदीप यांनी सांगितले. भंडारी हे दुर्गम भागातील गाव असून झाला प्रकार गावात समजल्यानंतर ग्रामस्थ आश्चर्यचकीत झाले आहेत.

Web Title: In just 22 hours, she 'orphaned' again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.