ललिता साळवेंमुळे पोलीस दलात येणार नवीन नियम? खात्यांतर्गत वैद्यकीय तपासणीचे अधीक्षकांना आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 05:15 AM2017-11-29T05:15:31+5:302017-11-29T05:16:05+5:30

Lalita Salve due to new rules in police force? Order to the Medical Inspection Superintendent under the department | ललिता साळवेंमुळे पोलीस दलात येणार नवीन नियम? खात्यांतर्गत वैद्यकीय तपासणीचे अधीक्षकांना आदेश

ललिता साळवेंमुळे पोलीस दलात येणार नवीन नियम? खात्यांतर्गत वैद्यकीय तपासणीचे अधीक्षकांना आदेश

Next

 सोमनाथ खताळ

बीड : लिंगबदलाची परवानगी मागणा-या बीड पोलीस दलातील ललिता साळवे यांच्या वैद्यकीय तपासणीचे आदेश देण्यात आले आहेत. तपासणीत त्या शस्त्रक्रियेसाठी पात्र असल्याचे स्पष्ट झाल्यास पोलीस दलात नवीन तसेच सुधारित नियमांची निर्मिती करावी लागणार आहे. आस्थापनेच्या दृष्टीने गृह विभागाला ते करावे लागणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
पोलिसांकडून ललीताकडे ‘विशेष प्रकरण’ म्हणून पाहिले जात आहे. ललिता या माजलगाव शहर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. उत्कृष्ट धावपटू म्हणून त्यांची राष्ट्रीय पातळीवर ओळख आहे. त्यांनी लिंगबदल करण्यासाठी रजेचा अर्ज पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्याकडे केला होता. अधीक्षकांनी हा अर्ज पोलीस महानिरीक्षकांकडे पाठविला. तेथून महासंचालकांकडे गेला. महासंचालक माथूर यांनी हा अर्ज फेटाळून लावला. त्यानंतर साळवे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने मॅटमध्ये जाण्याचा सल्ला दिला आहे.
ललिता यांना लिंग बदल झाल्यानंतर पोलीस खात्यात पुरूष म्हणून कायम रहायचे आहे. परंतु असा नियम पोलीस विभागात नाही. त्यामुळे पोलीस अडचणीत सापडले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच या प्रकरणाकडे सहानुभूतीपूर्वक पाहण्याचे आदेश महासंचालकांना दिले होते. त्यानुसार महासंचालक माथूर यांनी अधीक्षक जी. श्रीधर यांना एक पत्र पाठवून साळवे यांची वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश दिले.
त्याप्रमाणे उपअधीक्षक सावंत (गृह) हे मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात गेले असून ४ डिसेंबर रोजी तिची तपासणी करण्यासाठी वेळ
मिळाला आहे. या तपासणीत तिला किती वर्षांपासून हार्मोन्सचा
बदल जाणवत आहे. ती शस्त्रक्रियेसाठी सक्षम आहे का? याबाबत अभिप्राय मागितल्याचे सूत्रांनी सांगितले.

अधीक्षकांची भेट

लिंग बदलासाठी ललिता या मुंबईत मुक्कामी होत्या. मंगळवारी त्या बीडमध्ये आल्या असून त्यांनी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांची भेटही घेतली आहे. वैद्यकीय तपासणी करण्यासंदर्भात त्यांना पुन्हा मुंबईला जावे लागणार असल्याचे अधीक्षकांनी सांगितले आहे.

ललिता साळवे यांच्या वैद्यकीय तपासणीचे आदेश मिळाले आहेत.
४ डिसेंबरला तपासणी केली जाईल. ही पहिलीच केस असल्याने आम्ही तिच्याकडे विशेष लक्ष देत आहोत. लिंग बदलानंतर तिला सेवेत कायम ठेवण्यासंदर्भात अद्यापतरी नियम नाही. बाकी निर्णय वरिष्ठांच्या हाती आहेत.
- जी. श्रीधर, पोलीस अधीक्षक, बीड

Web Title: Lalita Salve due to new rules in police force? Order to the Medical Inspection Superintendent under the department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.