कमळ की घड्याळ; विनायक मेटेंच्या भूमिकेकडे लक्ष !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 02:28 PM2019-04-11T14:28:27+5:302019-04-11T14:30:34+5:30
शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात आज भूमिका जाहीर करणार
बीड : ‘राज्यात भाजपसोबत परंतु बीडमध्ये प्रचार करणार नाही’ अशी दुहेरी भूमिका घेणाऱ्या शिवसंग्रामच्या आमदार विनायक मेटेंना प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी ‘असे चालणार नाही, एकच ठरवा’ असा अल्टीमेटम दिल्यानंतर बीड येथे गुरुवारी दुपारी शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे. यात मेटे काय निर्णय घेतात याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
पालकमंत्री पंकजा मुंडे आणि विनायक मेटे यांच्यातील वाद टोकाला गेला. सतत पालकमंत्र्यांकडून जिल्ह्यात होत असलेल्या कोंडीमुळे मेटे यांनी समर्थकांच्या बैठकीत भाजपचा जिल्ह्यात प्रचार करणार नाही, परंतु राज्यात मात्र युतीचा घटक म्हणून भाजपसोबत असेल, असे जाहीर केले होते. त्यांची ही दुहेरी भूमिका भाजप श्रेष्ठींनाही आवडली नाही. कोणताही एकच निर्णय घ्या. राज्यात सोबत असाल तर बीड जिल्ह्यातही भाजपसोबत काम करावे लागेल, असे प्रदेशाध्यक्षांनी सांगितले होते. यानंतरही आ. मेटे हे लोकसभेच्या प्रचारार्थ बीड जिल्ह्याबाहेर भाजपसोबत दिसले; परंतु बीडमध्ये मात्र त्यांची भूमिका बदलली नव्हती.
इकडे पंकजा मुंडे यांनीही मेटे यांच्या या ‘असहकार्य’च्या भूमिकेला फारसे महत्त्व न देता शिवसंग्रामचेच दोन जि. प. सदस्य फोडून चोख उत्तर दिले होते. यानंतरही पत्रकारांशी संवाद साधताना आपण मेटेंशी या विषयावर बोलणार नाही, कारण त्यांनी हा निर्णय घेतला, असे सांगून विषय बंद केला. भाजपच्या शिस्तीत मेटेंचे हे वागणे बसत नव्हते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या संदर्भात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुंडेंकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. लोकसभेची निवडणूक असतानाही पंकजा मुंडे या दोन पावले पुढे येण्यास तयार नाहीत. आगामी विधानसभेच्या दृष्टीकोनातून बघितले असता भविष्यातही मुंडेंकडून मेटेंना सहकार्य मिळेलच याची शक्यता नाही.
‘लाल दिव्या’ला अडथळा!
इकडे मेटेंची राष्ट्रवादी काँग्रेससोबतची ‘घडी’ बिघडलेली आहे. राष्ट्रवादीचे बीडचे स्थानिक आमदार जयदत्त क्षीरसागर युतीच्या संपर्कात असल्यामुळे त्यांचे पुतणे संदीप क्षीरसागर यांचा राष्ट्रवादीकडून विधानसभा उमेदवारीसाठीचा मार्ग मोकळा झालेला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये जाऊनही फारसे काही हाती लागणार नाही. अशा परिस्थितीमध्ये मेटे यांना उद्याच्या मेळाव्यामध्ये ठोस निर्णय घ्यावा लागणार आहे. मुख्यमंत्र्यांसोबत असलेली घनिष्ट मैत्रीच कदाचित त्यांचा भाजपसोबतचा निर्णय बदलू शकते. युती सरकारचा कार्यकाळ सहा महिने बाकी आहे. युतीसोबत जर ते राहिले नाही तर भविष्यात त्यांच्या ‘लाल’ दिव्याच्या मार्गात आणखी अडथळा निर्माण होऊ शकतो. अशा या परिस्थितीत उद्याच्या निर्णयाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.