Maharashtra Election 2019 : मोदी- शहांना माझी धास्ती; झोपेतही माझेच नाव घेत असतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 06:23 PM2019-10-18T18:23:17+5:302019-10-18T18:36:03+5:30

Maharashtra Election 2019: पाच वर्षात हिताचे एकही काम नाही; कार्यकाळ केवळ आश्वासनातच घालवला

Maharashtra Election 2019: Modi-Shah scared of me; Even if they sleep, they are taking my name | Maharashtra Election 2019 : मोदी- शहांना माझी धास्ती; झोपेतही माझेच नाव घेत असतील

Maharashtra Election 2019 : मोदी- शहांना माझी धास्ती; झोपेतही माझेच नाव घेत असतील

Next
ठळक मुद्देसत्ता परिवर्तन ही महाराष्ट्राची गरज सरकारला नव्या पिढीची चिंता नाही तरूण पिढीच सत्ता परिवर्तन करेलमुंदडांच्या पक्षबदलावर पवारांचे मौन 

अंबाजोगाई : भाजपा -सेना युतीचा पाच वर्षाचा कार्यकाळ केवळ आश्वासनातच गेला. राज्याच्या हिताचे एकही काम झाले नाही. अशा सरकारला घरी पाठवून राज्यात परिवर्तन आणण्यासाठी  नव्या पिढीने ही निवडणूक हाती घेतली आहे. सत्ता परिवर्तन ही महाराष्ट्राची गरज आहे. असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केले. 

केज  व परळी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार पृथ्वीराज साठे व आ. धनंजय मुंडे यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी दुपारी अंबाजोगाईत वंजारी वसतिगृहाच्या मैदानावर  शरद पवार यांची सभा झाली. यावेळी व्यासपिठावर माजी मंत्री पंडितराव दौंड, धनंजय मुंडे, पृथ्वीराज साठे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी, बजरंग सोनवणे, अंबाजोगाईच्या नगराध्यक्षा रचना मोदी, केजचे नगराध्यक्ष आदित्य पाटील, डॉ. नरेंद्र काळे, बाबुराव मुंडे, अनंतराव जगतकर, उल्हास पांडे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. 

यावेळी बोलतांना पवार म्हणाले की, परळी मतदारसंघात धनंजय मुंडे यांचे विजयी वातावरण दिसू लागल्याने पंतप्रधानांना व गृहमंत्र्यांना इथे येण्याची वेळ आली. मोदी व शहा यांची एकही सभा माझे नाव घेतल्याशिवाय पूर्ण होत नाही. इतकी धास्ती त्यांनी घेतली आहे. झोपेतही ते माझे नाव घ्यायला विसरत नसतील. पवारांनी काय केले? हा प्रश्न सातत्याने विचारला जातोय. गेल्या ५० वर्षात मी केलेल्या कामाचा लेखा-जोखा जनतेत जाऊन विचारा म्हणजे समजेल. महाराष्ट्राच्या हिताचे अनेक धोरणात्मक निर्णय आपण घेतले. देशात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकाचे राज्य निर्माण केले. महिलांना आरक्षण, विविध समाजांना आरक्षण, विद्यापिठांचे नामांतर, शेतकऱ्यांची कर्जमाफी, असे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय आपल्या कार्यकालात झाल्याचा विसर भाजपाला पडला असल्याची त्यांनी सांगितले. 

पुढे बोलतांना शरद पवार म्हणाले की, शेतकऱ्यांची दुरावस्था दिवसेंदिवस वाढू लागली आहे. शेतकरी कर्जबाजारी झालाय. तरीही सरकार सक्तीने त्यांची कर्जवसुली करीत आहे. त्यांच्या या अशा आडमुठ्या धोरणामुळे महाराष्ट्रात १६ हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. पीकच येत नाही. तिथं पीक कर्ज कसं भरणार. यासाठी आघाडी सरकार आल्यास शेतकऱ्यांची सरसगट कर्जमाफी करू, शेतीमालाला हमीभाव देऊ असे आश्वासन त्यांनी दिले. या सरकारने पाच वर्षात केवळ थापाच मारण्याचे काम केले. छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काय झाले? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ज्या किल्ल्यांना शौर्याचा इतिहास आहे. जिथे तलवारींचा खणखणाट झाला. तिथे आता हे सरकार दारूचे गुत्ते उघडायला निघाले आहे. नव्या पिढीला तुम्ही कोणता इतिहास शिकवणार असा प्रश्न विचारून नव्या पिढीचे भवितव्य या शासनाने अंधकारमय केले. ही नवी पिढीच आता सत्ता परिवर्तनासाठी सज्ज असल्याची पवारांनी सांगितले. शासन धमकावून व दडपशाहीने विविध नेत्यांवर दबाव आणत आहे. असा दबाव माझ्यावरही आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो प्रयत्न फोल ठरला. 

शासन आता ३७० कलम हटविल्याचा गवगवा करत आहे. त्या भागाचा सांस्कृतिक वारसा जोपासण्यासाठी हे कलम ठेवण्यात आले होते. हे कलम हटविल्यामुळे त्या भागात जाऊन शेती करण्याचा  अधिकार आला. मात्र, इथेच शेतीला लोक कंटाळलेत. ते काश्मीरमध्ये कशाला जातील? अशी टीका पवारांनी केली. अंबाजोगाई व परळी पंचताराकिंत वसाहत उभारून बेरोजगारांना न्याय देण्यासाठी मुंडे-साठे प्रयत्नशील राहतील. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन पवारांनी केले. यावेळी पंडितराव दौंड, धनंजय मुंडे, पृथ्वीराज साठे, राजकिशोर मोदी, बजरंग सोनवणे, यांची भाषणे झाली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचलन डॉ. नरेंद्र काळे यांनी केले. तर उपस्थितांचे आभार बबन लोमटे यांनी मानले. या सभेस महिला व मतदारांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. 

मुंदडांच्या पक्षबदलावर पवारांचे मौन
अंबाजोगाईत झालेल्या जाहिर सभेत शरद पवार मुंदडांच्या पक्षबदलावर काय भाष्य करणार. याकडे सर्वांचे लक्ष वेधले होते. पवारांच्या भाषणाअगोदर धनंजय मुंडे, पृथ्वीराज साठे, बजरंग सोनवणे, राजकिशोर मोदी यांनी मुंदडांच्या पक्षबदलावर कडाडून टिका केली. तसेच अक्षय मुंदडा यांच्या भाषणाची क्लिपही भरसभेत वाजवून दाखवली. मात्र, पवारांनी आपल्या चाळीस मिनिटांच्या भाषणात मुंदडांचा साधा उल्लेखही केला नाही. बीडमध्ये जयदत्त क्षीरसागरांच्या पक्षबदलावर कडाडून तोफ डागणाऱ्या पवारांनी अंबाजोगाईत मुंदडांबद्दल बाळगलेल्या मौनामुळे उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे.

Web Title: Maharashtra Election 2019: Modi-Shah scared of me; Even if they sleep, they are taking my name

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.