Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी अंबाजोगाईत मराठ्यांचा जागर गोंधळ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 04:47 PM2018-08-03T16:47:51+5:302018-08-03T16:50:36+5:30
एक मराठा, लाख मराठा या घोषणेसह आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाने केलेल्या जागर गोंधळामुळे अवघी अंबानागरी दुमदुमून गेली.
अंबाजोगाई : एक मराठा, लाख मराठा या घोषणेसह आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाने केलेल्या जागर गोंधळामुळे अवघी अंबानागरी दुमदुमून गेली. या गोंधळात मराठा तरुण हजारोंच्या संख्येने सहभागी झाला होता. या आंदोलनाच्या आयोजनापासून ते समारोपापर्यंत सर्व जबाबदारी तरुणांनी यशस्वीरीत्या आणि अंबाजोगाईच्या परंपरेला साजेशी पार पाडली. कुठलाही अनुचित प्रकार न होता आंदोलन शांततेत पार पडले.
अतिशय शांततेत आणि शिस्तीचे प्रदर्शन घडवीत ५८ मोर्चे काढूनही समाजाच्या मागण्यांवर विचार होत नसल्याने मागील महिन्यापासून क्रांती मोर्चाचे रुपांतर ठोक मोर्चात झाले आहे. गंगापूर येथे काकासाहेब शिंदे या तरुणाने आरक्षणाच्या मागणीसाठी जलसमाधी घेतल्यानंतर आंदोलन अधिक चिघळले. राज्यात आगडोंब उसळला, नंतरही अनेक आत्महत्या झाल्या. याचा निषेध आणि आरक्षणाच्या मागणीसाठी अंबाजोगाई तालुक्यातील तरुणांनी आज जागर गोंधळ आयोजित केला होता.
यानिमित्ताने आयोजित रैलीत हजारो तरुणांनी सहभाग नोंदविला. नगर परिषद कॉम्प्लेक्सपासून या रैलीस सुरुवात झाली. पाटील चौक, योगेश्वरी देवी मंदिर आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक याठिकाणी थांबून जागर गोंधळ करण्यात आला. पारंपारिक वेशभूषेतील कलाकारांनी जागर गोंधळाद्वारे आरक्षणाची मागणी केली. शालेय विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनी जोशपूर्ण भाषणे केली.
यावेळी तरुणांनी प्रचंड घोषणाबाजी करत आरक्षणाची मागणी केली आणि आरक्षणाबाबत संथ भूमिका घेणाऱ्या सरकारचा निषेध केला. त्यानंतर उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांच्याकडे मागण्यांचे निवेदन देऊन आंदोलनाची सांगता झाली. यावेळी मुस्लीम समाजातर्फे आंदोलाकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली. तसेच अपर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सोमनाथ गिते यांनी फौजफाट्यासह संपूर्ण वेळ आंदोलनकर्त्यांसोबत राहून परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवले.
काय आहेत मागण्या?
मराठा आरक्षणाचा कालबद्ध कार्यक्रम घोषित करावा, आरक्षण घोषित केल्याशिवाय मेगाभरती प्रक्रिया सुरु करू नये, मराठा आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत, शहीद मराठा बांधवांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५० लाखांची आर्थिक मदत आणि कुटुंबातील एका सदस्याला कायमस्वरूपी शासकीय नोकरी द्यावी, जिल्हा स्तरावर मराठा वसतिगृहाची तत्काळ निर्मिती करावी, मराठा विद्यार्थ्यांना सर्व प्रकारचे शैक्षणिक शुल्क माफ करावे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळासाठी तत्काळ एक हजार कोटींची तरतूद करावी आदी मागण्या यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आल्या. लवकरात लवकर मागण्या मान्य केल्या नाहीत तर अधिक तीव्र आंदोलनाचा इशारा मराठा समाजातर्फे देण्यात आला.