Maratha Reservation : बीड जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी आणखी दोघांची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2018 05:52 PM2018-08-09T17:52:50+5:302018-08-09T17:54:34+5:30
मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने आणखी दोघांनी जीवनयात्रा संपविली. या घटना गेवराई तालुक्यातील कांबी मजरा व बीड तालुक्यातील पाटेगाव येथे बुधवारी रात्री घडल्या.
बीड : मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने आणखी दोघांनी जीवनयात्रा संपविली. या घटना गेवराई तालुक्यातील कांबी मजरा व बीड तालुक्यातील पाटेगाव येथे बुधवारी रात्री घडल्या. आतापर्यंत जिल्ह्यात सहा जणांनी आरक्षणासाठी जीवन संपविले आहे. प्रशासनाकडून १० लाख रुपये मदत व कुटुंबातील एकाला शासकीय नौकरी देण्याचे लेखी पत्र संबंधित कुटुंबाला दिले आहे.
एकनाथ सुखदेव पैठणे (रा. कांबी मजरा) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. पैठणे यांचा आरक्षणासंदर्भातच्या प्रत्येक आंदोलनात सहभाग होता. बुधवारी सकाळी सिरसदेवी येथून काढलेल्या रॅलीतही त्यांनी सहभाग नोंदवला होता. सायंकाळी घरी आल्यानंतर त्यांनी विष प्राशन केले. त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात आणले. तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा असा परिवार आहे. दरम्यान, एकनाथ पैठणे यांचा मुलगा कृष्णा याच्या जवाबावरुन ही आत्महत्यामराठा आरक्षणासाठी झाल्याचे सांगण्यात आले.
दिगांबर माणिक कदम (३५ रा.पाटेगाव) यांनीही बुधवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. कदम हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. बुधवारी आई- वडील व पत्नी शेतात होते. सायंकाळी घरात आडूला दोरीने गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली. रात्री कुटुंबीय शेतातून परतल्यावर त्यांना हा प्रकार दिसला. कदम यांच्या खिशात एक चिठ्ठी आढळून आली असून त्यात मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करीत असल्याचा उल्लेख आहे. घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरा मृतदेह बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला होता. यावेळी तहसीलदार अविनाश शिंगटे यांनी येथे भेट दिली. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.
प्रशासनाकडून मदतीचे लेखी पत्र
प्रशासनातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांनी तातडीने कदम व पैठणे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. वस्तुस्थिती जाणून घेतली. त्यांच्या माहितीवरून त्यांना १० लाख रुपये सानुग्रह अनुदान व कुटुंबातील सदस्याला तातडीने नौकरीवर घेण्याचे लेखी पत्र दिले.
जिल्ह्यात सहावी आत्महत्या
मराठा आरक्षणासाठी आतापर्यंत सहा जणांनी जीवनयात्रा संपविली आहे. बीड तालुक्यात ३, पाटोदा, गेवराई व केज तालुक्यात प्रत्येकी एक अशा आत्महत्या झाल्या आहेत.