बीडमध्ये जिल्हा परिषदेच्या कार्यालयांसह शाळा, ग्रामपंचायतमध्ये प्लास्टिक बंदी मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 12:35 AM2018-08-11T00:35:39+5:302018-08-11T00:35:57+5:30
बीड : राज्यात संपूर्ण प्लास्टिक बंदीबाबत शासनाने निर्णय घेतल्यानंतर शहरी भागात अंमलबजावणीचे प्रयत्न झाले. ग्रामीण भागात प्लास्टिक बंदीची प्रभावी अंमलबजावणी व्हावी म्हणून शासनाच्या सूचना आहेत. मात्र गाव ते शहर पातळीपर्यंत होत असलेल्या आरक्षण आंदोलनाकडेच जनतेचे लक्ष केंद्रित झाल्याने ग्रामीण भागात प्लास्टिक बंदीची मोहीम थंडावली होती.
दरम्यान प्लास्टिक बंदीच्या प्रभावी अंमलबाजवणीसाठी जिल्हा परिषद प्रशासन कामाला लागले आहे. प्रदूषण निर्माण करणाऱ्या प्लास्टिकची विल्हेवाट लावून शाळा, गाव तसेच कार्यालयीन पातळीवर प्लास्टिकमुक्त मोहीम राबवून आठवड्याच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी दिले आहेत.
महाराष्टÑ विघटनशिल व अविघटनशिल कचरा नियंत्रण कायदा २००६ नुसार संपूर्ण राज्यात प्लास्टिक बंदी लागू आहे. कमी जाडीच्या कॅरी बॅग, एकदाच वापरातील प्लास्टिकचे ताट, वाय्या, ग्लास, स्टॉ, प्लास्टिक पाऊच, कप आदी वस्तुंची वाहतूक, व्यापार तसेच वापरावर प्रतिबंधित केल्या आहेत. तसेच संपूर्ण राज्यात प्लास्टिक व थर्माकोलचा वापर सजावटीमध्ये करण्यास बंदी आहे. जिल्ह्यात शहरी भागात नगर पालिकेने ही मोहीम राबविली. आता ग्रामीण भागात प्रभावी अंमलबजावणीचे निर्देश शासनाने दिले आहेत.
प्लास्टिक बंदी कायद्यातील तरतुदींच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा परिषदअंतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी व ग्रामसेवकांना त्यांच्या कार्यक्षेत्रात प्राधिकृत करण्यात आले आहे.
मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी या संदर्भात सर्व संलग्न कार्यालय प्रमुखांना प्लास्टिकचा वापर होणार नाही तसेच प्लास्टिकला पर्यायी वस्तूंचा वापर सुरु केला जाईल यासाठी विभागांचा आढावा घेऊन कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.
पहिल्याच दिवशी शिक्षकाला एक हजाराचा दंड
मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी प्लास्टिक बंदीच्या प्रभावी अंमलबजावणीसंदर्भात आदेश जारी केले आहेत. शुक्रवारी जिल्हा परिषदेमध्ये त्यांच्या दालनामध्ये ३४ शिक्षकांची सुनावणी होती. सुनावणीसाठी आलेल्या एका शिक्षकाने सोबत प्लास्टिक कॅरीबॅग आणली होती. ही बाब निदर्शनास येताच या शिक्षकाला एक हजार रुपये दंड करण्यात आला.
येत्या १४ आॅगस्ट रोजी जिल्हा परिषद अंतर्गत सर्व कार्यालये, पंचायत समिती, आरोग्य केंद्र, पशुवैद्यकीय दवाखाने, शाळांमध्ये प्लास्टिक एकत्रित करुन नष्ट करण्याची एकदिवसीय मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यानंतर प्लास्टिक आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार आहे.
कार्यालये करावीत प्लास्टिकमुक्त
जिल्हा परिषद अंतर्गत सर्व जिल्हा व तालुका कार्यालय व परिसरातील प्लास्टिक जमा करून त्याची विल्हेवाट लावावी. प्लास्टिक फाईलऐवजी ज्यूट, कागदी फाईल, प्लास्टिक फोल्डरऐवजी कागदी पिशवी, पुस्तकांना ज्यूट फोल्डर फाईल, कागदी कव्हरचा वापर करावा. ‘प्लास्टिकमुक्त कार्यालय’ असे फलक दर्शनी भागात लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
शाळा, आरोग्य केंद्र, ग्रा.पं.होणार प्लॅस्टिकमुक्त
जिल्ह्यातील सर्व शाळा, आरोग्य केंद्र, उपकेंद्र, प्लॅस्टिकमुक्त करण्यासाठी ग्रामपंचायतमध्ये अभियान राबविण्याबाबत शिक्षण आणि आरोग्य विभागाला देण्यात आल्या आहेत. सर्व ग्रामपंचायतमध्ये हे अभियान राबविण्याची जबाबदारी पंचायत आणि पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे जबाबदारी दिली आहे.
कार्यक्रमात प्लास्टिक आढळल्यास दंड
जिल्हा परिषदेशी संबंधित उद्घाटन, वरिष्ठ अधिकारी भेट, शासकीय कार्यक्रम, बैठका, सेवानिवृत्ती कार्यक्रम, निरोप, स्वागत समारंभ, स्नेहसंमेलन, सांस्कृतिक कार्यक्रमात प्लास्टिक वेष्टनातील पुस्तक, पुष्पगुच्छ आदीचा वापर आढळल्यास आयोजकास जबाबदार धरून दंडात्मक कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.
बीडमध्ये ५१ जणांना दंड
बीड शहरात आतापर्यंत ११५० दुकानांची तपासणी करण्यात आली. प्लास्टिक बाळगून वापर व विक्री करणाºया ५१ व्यापाºयांवर दंडात्मक कारवाई झाली. या कारवाईत १०१५ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले तर १ लाख ३८ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. याशिवाय जिल्ह्यात केवळ अंबाजोगाई येथे एक कारवाई वगळता इतरत्र कुठेही कारवाई झाली नाही.