बीड पोलिसांचा दुजाभाव; लाच प्रकरणातील पोलिसाला दिले कोठडीबाहेर उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2019 03:47 PM2019-01-07T15:47:53+5:302019-01-07T15:55:16+5:30
कोठडीत उपचार न करता सर्वसामान्य रुग्णाप्रमाणे कोठडीबाहेर उपचार केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी समोर आला आहे.
बीड : लाच प्रकरणात अटक केलेल्या पोलीस हवालदाराला न्यायालयीन कोठडी मिळाली. नंतर छातीत दुखू लागल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. येथे कोठडीत उपचार न करता सर्वसामान्य रुग्णाप्रमाणे कोठडीबाहेर उपचार केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी समोर आला आहे. नियमानुसार कोठडीबाहेर आरोपीला काढता येत नाही. मग तो कुख्यात असो वा सर्वसामान्य. आरोपी हा आरोपीच असतो. मात्र, बीड पोलिसांचा या निमित्ताने दुजाभाव चव्हाट्यावर आला आहे.
बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील हवालदार शंकर राठोड यांना १० हजार रुपयांची लाच घेताना जालना एसीबीने रंगेहाथ पकडले होते. त्यानंतर न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर कारागृहात पाठविण्यात आले. रविवारी राठोड यांच्या छातीत दुखू लागल्याने सायंकाळी पाच वाजता जिल्हा रुग्णालयात दाखल केले. बंदोबस्तासाठी पोलीस कर्मचारीही ठेवण्यात आला. मात्र, राठोड यांना कोठडीत ठेवून उपचार करण्याऐवजी डॉक्टरांनी कोठडीबाहेर उपचार केले असल्याचे समोर आले आहे.
एरव्ही आरोपीला भेटू न देणारे पोलीस या प्रकरणात मात्र शिथिल झाल्याचे दिसले. आपल्या खात्यातील कर्मचाऱ्याला त्यांनी ‘माणुसकी’तून सूट दिली. आता ही सूट त्यांच्या अंगलट येणार असल्याचे बोलले जात आहे. आरोपी हा आरोपीच असतो. आवश्यक त्या सर्व जबाबदाऱ्या व काळजी घेणे अपेक्षित असतो. मात्र, या प्रकरणात पोलिसांनी दुजाभाव केल्याने त्यांच्याबद्दल संशय व्यक्त होत आहे. यावर काय कारवाई होते ? याकडे लक्ष लागले आहे.
नातेवाईकांचा गराडा
सोमवारी सकाळी ११.३० वाजता शंकर राठोड यांच्यावर उपचार सुरु असताना त्यांच्याभोवती नातेवाईकांचा गराडा होता. यामुळे बाजूच्या रुग्णांना त्रास सहन करावा लागला. हा प्रकार येथील सुरक्षारक्षक पाहत होते. मात्र, त्यांनी याकडे कानाडोळा केला.
काय म्हणतयं पोलीस- आरोग्य प्रशासन...
याबाबत अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुखदेव राठोड यांना विचारले असता, कोठडीबाहेर उपचार करणे चुकीचे असल्याचे सांगितले. तात्काळ वार्डमध्ये संपर्क करुन कोठडीत ठेवण्याचे आदेश थेट पोलीस कर्मचाऱ्यालाच फोनवरुन दिले. तर वार्डचे प्रमुख डॉ. बाळासाहेब टाक म्हणाले, मी उपचार केले तेव्हा आरोपी कोठडीबाहेरच होता. रुग्ण दाखल झाल्यापासून काय झाले ते मला माहीत नाही. माहिती घेऊन सांगतो असे ते म्हणाले. यावरुन प्रमुखांनाही वार्डमधील या गंभीर प्रकाराची माहिती नसल्याचे समोर येते. ही जबाबदारी आपली नसून, पोलिसांची असल्याचे सांगत त्यांनी हात झटकले.
शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पगार म्हणाले, कोठडीबाहेर उपचार करता येत नाहीत. येथील सुरक्षारक्षकाची ही जबाबदारी आहे. गैरप्रकार घडल्यास अंगलट येऊ शकते. याची माहिती घेतली जाईल. चौकशी करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.