पाऊस उघडला, दिवाळीचा बाजार फुलला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2019 12:26 AM2019-10-27T00:26:46+5:302019-10-27T00:26:52+5:30
शनिवारी पावसाने उघडीप दिल्याने व सूर्यदर्शन झाल्याने बाजारात ग्राहकांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर दिसून आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : विधानसभा निवडणुकीच्या निकालापर्यंत शुकाशुकाट असलेल्या बाजारपेठेलादिवाळीच्या तोंडावर ग्राहकी अपेक्षित होती. मात्र, नंतरच्या दोन दिवसात जिल्ह्यात झालेल्या पावसाने बाजाराच्या आशेवर पाणी फेरले. अखेर शनिवारी पावसाने उघडीप दिल्याने व सूर्यदर्शन झाल्याने बाजारात ग्राहकांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर दिसून आली.
यावर्षी पावसाळी मोसमात अपुरा पाऊस झाल्याने दुष्काळी सावट होते. त्यामुळे दसऱ्याच्या वेळी बाजारपेठेत फारशी उलाढाल झाली नाही. मात्र, मागील आठवड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे रबीच्या आशा उंचावल्यामुळे तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असल्याने दिवाळीचा सण साजरा करण्यासाठी बाजारात कपडे, शोभीवंत वस्तू, दागिने, नवीन खरेदीसाठी ग्राहकांची शनिवारी दुकानांमध्ये गर्दी दिसून आली. सुभाष रोड, भाजी मंडई, कारंजा, जालना रोड, धोंडीपुरा, सिध्दीविनायक कॉम्प्लेक्स परिसर गर्दीने फुलला होता. त्याचबरोबर वारंवार वाहतुकीची कोंडी होत होती.
पावसामुळे खरेदी करणे शक्य झाले नाही अशा ग्राहकांनी आकाशदिवे खरेदी केले. त्या चांगल्या प्रमाणात विक्री झाल्यामुळे व्यापाऱ्यांनीही सुटकेचा नि:श्वास टाकला. रांगोळी, पणती, गृहसजावटीचे साहित्य, फुलांच्या माळा, विद्युत रोषणाईचे साहित्य खरेदी करण्यात ग्राहक मग्न होते. बांगड्या, इमिटेशन ज्वलेरीची महिला वर्गाकडून खरेदी होत होती.
फटाका बाजारात ८० दुकाने थाटलेली आहेत. सुमारे तीन कोटी रुपयांपर्यंत फटाके व्यापारी गुंतवणूक करतात. आठवडाभर पावसामुळे बाजार परिसरात चिखल साचला, तर काही व्यापा-यांचा माल भिजल्याने नुकसान झाले. यंदा ग्राहक येतील की नाही, अशी चिंता असताना शनिवारी उघडीप झाल्याने सर्वच दुकानांवर ग्राहकांची गर्दी पाहायला मिळाली.
दस-याच्यावेळी गुंतवणूक करुनही दुष्काळी स्थितीमुळे कापड बाजाराकडे ग्राहक फिरकलेला नव्हता. मात्र, पाऊस झाल्याने खरिपाचे नुकसान झाले तरी रबी हंगाम चांगला जाईल आणि टंचाई मिटल्याने कापड बाजारात रेडीमेड कपडे, साड्यांच्या खरेदीसाठी ग्राहकांची पावले वळाली. बँ्रडेड कपड्यांना त्यांनी प्राधान्य दिले.