परिवर्तन मल्टीस्टेट घोटाळ्यातील ५ आरोपींचा अटकपूर्व जामीन फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 01:34 PM2018-05-08T13:34:31+5:302018-05-08T13:34:31+5:30
शेकडो ठेवीदारांना करोडो रुपयंचा गंडा घालून परिवर्तन मल्टीस्टेटच्या अध्यक्षासह संचालक फरार झाले आहेत. फरार झालेल्या पाच आरोपींचा अटकपूर्व जामीन माजलगाव सत्र न्यायालयाने सोमवारी फेटाळला आहे.
माजलगाव (बीड ) : शेकडो ठेवीदारांना करोडो रुपयंचा गंडा घालून परिवर्तन मल्टीस्टेटच्या अध्यक्षासह संचालक फरार झाले आहेत. फरार झालेल्या पाच आरोपींचा अटकपूर्व जामीन माजलगाव सत्र न्यायालयाने सोमवारी फेटाळला आहे. या निकालामुळे ठेवीदारांना दिलासा मिळाला असून, मुख्य आरोपी विजय अलझेंडेसह इतर फरार आरोपींचे धाबे दणाणले आहे.
परिवर्तन मल्टीस्टेट, सामाजिक परिवर्तन पतसंस्थेने ज्यादा व्याजदराचे आमिष दाखवून कोट्यवधींच्या ठेवी गोळा केल्या. ही मल्टीस्टेट १८ ते २० टक्के व्याज देत असल्याने सर्वसामान्यासह अनेकांनी या संस्थेत जवळपास ३० कोटी रुपयांच्या ठेवी ठेवल्या. स्वत:च्या फायद्यासाठी अध्यक्ष विजय अलझेंडेसह संचालक, अधिकाऱ्यांनी ठेवीदारांच्या पैशांची अफरातफर केली. मुदत संपूनही ठेवीदारांच्या ठेवी परत न देता अध्यक्ष विजय अलझेंडे अचानक फरार झाल्याने ठेवीदारांनी १२ एप्रिल रोजी पोलिसात धाव घेऊन तक्रार दाखल केली. यावरून अध्यक्ष, संचालक, अधिकारी, कर्मचारी अशा एकूण ३६ जणांवर शहर पोलीस ठाण्यात एम.पी.आय.डी. कायद्यासह फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. यामुळे सर्वच आरोपी मागील वीस दिवसांपासून फरार झाले आहेत. अटकपूर्व जमीन मिळावा यासाठी पंधरा ते वीस संचालक, कर्मचाऱ्यांनी माजलगाव न्यायालयात अर्ज दाखल केले आहेत.
पाच संचालकांच्या जामीन अर्जावर शनिवारी सुनावणी होऊन निकाल राखून ठेवला होता. सोमवारी सत्र न्यायालयाने ठेवीदारांचे हित लक्षात घेत पाचही जणांचा जमीन अर्ज फेटाळला. या निकालाने ठेवीदारांना दिलासा मिळाला असला तरी फरार आरोपींचे धाबे दणाणले आहेत. फिर्यादीकडून अॅड. भानुदास डक यांनी काम पाहिले.
ठेवीदारांच्या हिताचे मुद्दे सक्षमपणे मांडले
परिवर्तन मल्टीस्टेटमध्ये हातावर पोट भरणाऱ्या अनेक गोरगरिबांनी पै-पै बचत करून ठेवी ठेवल्या आहेत. अध्यक्ष, संचालकांच्या गैरकारभारामुळे अनेकांचे संसार रस्त्यावर आले आहेत. यांना जामीन मिळाल्यास सर्वसामान्य ठेवीदारांना त्यांचे पैसे मिळणार नाहीत. यासह ठेवीदारांच्या हिताचे अनेक मुद्दे सक्षमपणे न्यायालयासमोर मांडल्याचे अॅड. भानुदास डक यांनी सांगितले.
यांचे अटकपूर्व जामीन फेटाळले
अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी पूनम धाइजे, जयराम कांबळे, बालाजी कांबळे, बाबासाहेब ढगे यांनी अर्ज दाखल केला होता; परंतु न्यायालयांनी या सर्वांचा जामीन फेटाळला आहे.