बीड जिल्ह्यातील डोंगराला पाच शतकांनंतर मिळाले वैभव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 12:52 AM2018-04-16T00:52:44+5:302018-04-16T00:52:44+5:30
शिरूर कासार तालुक्यातील बीड- पाथर्डी मार्गावर रायमोह- खोकरमोहाच्या मध्यावर रस्त्यालगत किमान पाच शतकांपूर्वी रायमोहाच्या किल्ल्यावरून झालेल्या तोफांच्या माराने डोंगरावरील मंदिर भग्न झाले होते. या मंदिराचा जीर्णोद्धार होत असून, आता त्याचा प्रति मोहटादेवी असा नावलौकिक निर्माण होत आहे.
विजयकुमार गाडेकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरूर कासार : तालुक्यातील बीड- पाथर्डी मार्गावर रायमोह- खोकरमोहाच्या मध्यावर रस्त्यालगत किमान पाच शतकांपूर्वी रायमोहाच्या किल्ल्यावरून झालेल्या तोफांच्या माराने डोंगरावरील मंदिर भग्न झाले होते. या मंदिराचा जीर्णोद्धार होत असून, आता त्याचा प्रति मोहटादेवी असा नावलौकिक निर्माण होत आहे.
रायमोहाजवळ डोंगराच्या माथ्यावर दुुर्लक्षित मंदिराचा उर्जितकाळ सुरू झाला आहे. या पाच वर्षांत मंदिर परिसरात मोठा लक्षवेधी बदल दिसत आहे. लोकसहभागातून दीड कोटी रुपये खर्चून लाल दगडाचे मंदिर जोमाने उभारणीचे काम वेगात आहे. दुर्गम टेकडीमुळे मोठे आव्हान होते; परंतु दुर्दम्य इच्छाशक्ती व देवीच्या प्रबळ आशीर्वादाच्या जोरावर हे काम पूर्णत्वाकडे जात आहे.
राजस्थानातील बन्सीपहाडपूरचा लाल दगड वापरून मध्यप्रदेश, ओडिशाचे कारागीर अत्यंत कलाकुसरीचे मंदिराचे काम करत आहेत. सहा वर्षांपूर्वी २९ डिसेंबर रोजी मंदिर कामास सुरुवात झाली. वेगाने होणाऱ्या कामाकडे अनेकांचे लक्ष गेले व योगदानात वाढ होत गेली. मंदीर उभारणी सुरू असताना पायथ्याजवळून परळी-बीड-अहमदनगर रेल्वेमार्गाचे काम सुरू होते. निघालेले दगड मुरूम टाकण्यासाठी जागेच्या शोधात रेल्वेचे गुत्तेदार होते. यासाठी मंदिर परिसराची जागा मिळाली.
मंदीर परिसरातील जागेचे सपाटीकरण करण्यासाठी रेल्वेची मोठी मदतच झाली. रोज किमान दीडशे ते दोनशे टिप्पर माल पडत असून, आतापर्यत किमान ५५ हजार खेपा मंदिराभोवती पडल्याने जवळपास एक कि.मी. गोलाकार क्षेत्र विस्तार झाला आहे.
या कामाची पैशात किंमत काढल्यास ती तब्बल अकरा कोटीच्या घरात जाते. जमिनीपासून ११०० फूट उंचावर असलेल्या मंदिराभोवती गोलाकार २०० फूट रुंदीच्या प्रशस्त जागेचीही उपलब्धता झाली आहे.
तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश तांदळे पंचक्रोशीतील भाविकांसोबत हे काम करत आहे. देवीची प्रेरणाच यासाठी पाठबळ देत असून, सर्वांची मदत आहे. हे ठिकाण जागृत असल्यामुळे कामात अडचण येत नाही, अशी प्रतिक्रिया डॉ. तांदळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
प्रतिमोहटादेवी मंदिर
डोंगर जगदंबा मंदिर हे लवकरच प्रतिमोहटा म्हणून ओळखले जाईल. मोहट्याला आलेला प्रत्येक भाविक इथे आल्याशिवाय राहाणार नाही. तालुक्यातील धर्मपीठात डोंगर जगदंबा देवी मंदिर हे भाविकांसाठी एक मोठे आकर्षण राहणार आहे.भाविकांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेतली जाईल.