जिल्हा परिषदेत आज अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड; सत्तेसाठी दावे-प्रतिदावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2022 01:32 PM2022-05-10T13:32:15+5:302022-05-10T13:41:51+5:30
भंडारा जिल्हा परिषदेत कुण्या एका पक्षाला बहुमत नसल्याने गत तीन महिन्यांपासून कुणाची सत्ता येणार अशी चर्चा रंगत आहे.
भंडारा :जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड अवघ्या काही तासावर आली असताना कुणाची सत्ता येणार हा संभ्रम कायम आहे. सत्तेसाठी दावे-प्रतिदावे केले जात असून राष्ट्रवादीसोबत भाजप की काँग्रेससोबत भाजपचा नाराज गट अशी चर्चा रंगत आहे. सर्वच पक्षांमध्ये मंथन सुरू असून वरिष्ठ नेते तळ ठोकून आहेत.
भंडाराजिल्हा परिषदेत कुण्या एका पक्षाला बहुमत नसल्याने गत तीन महिन्यांपासून कुणाची सत्ता येणार अशी चर्चा रंगत आहे. निवडणूक अवघ्या काही तासांवर आली असतानाही सत्तेचा पेच कायम आहे. सर्वाधिक जागा मिळवून मोठा पक्ष ठरलेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात आघाडी होईल, असे सुरुवातीला बोलले जात होते. परंतु पंचायत समितीत सभापती निवडीने सर्व गणित बिघडविले. काँग्रेस आणि राष्ट्रवादीत दुरावा निर्माण झाला. अशा स्थितीत आता भाजप पुढे आला. मात्र भाजपमध्येही दुफळी निर्माण झाली. विकास फाऊंडेशनचा गट वेगळा झाला. भाजपचे पाच आणि एक अपक्ष अशा सहा सदस्यांसोबत सत्तेत भागीदारी करायची तयारी सुरू झाली. हा गट काँग्रेसशी जवळीक साधून आहे. राष्ट्रवादीला सत्तेबाहेर ठेवण्याचे मनसुबे रचले जात आहे. परंतु अशातच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी या नाराज गटाला राजी करण्याचे प्रयत्न सुरू केले. त्यामुळे सोमवारी दुपारनंतर सत्ता समीकरण बदलायला लागले. भाजप आणि राष्ट्रवादी अपक्षाच्या मदतीने सत्ता स्थापन करेल, अशी चर्चा सुरू झाली. मात्र यावर कुणीही ठामपणे बोलायला तयार नाही, अशा स्थितीत आता मंगळवारी दुपारी २.३० वाजेपर्यंत अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीसाठी प्रतीक्षा करावी लागेल.
असे आहे संख्याबळ
काँग्रेस २१
राष्ट्रवादी १३
भाजप १२
शिवसेना ०१
बसपा ०१
अपक्ष ०४
एकूण ५२
अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणूक कार्यक्रम
भंडारा जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवडणूक मंगळवार १० मे रोजी होत आहे. जिल्हा परिषदेच्या सभागृहात यासाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात येणार आहे. पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी संदीप कदम राहणार आहेत. सकाळी ११ ते दुपारी १२ या वेळात नामनिर्देशनपत्र स्वीकारणे, दुपारी २ वाजता विशेष सभेला प्रारंभ होईल, दुपारी २ ते २.१५ पर्यंत नामनिर्देशनपत्राची छाननी, दुपारी २.१५ ते २.३० पर्यंत उमेदवारी मागे घेणे आणि आवश्यकता असल्यास मतदान दुपारी २.३० वाजता घेतले जाईल.