अनुसूचित जाती, जमाती उमेदवारांना मिळणार केंद्राच्या नमुन्यातील जातीचे प्रमाणपत्र
By admin | Published: June 22, 2017 12:32 AM2017-06-22T00:32:23+5:302017-06-22T00:32:23+5:30
अनुसूचित जाती, अनुसूचित जनजातीच्या उमेदवारांना केंद्राच्या जातीच्या प्रमाणपत्राच्या सुधारित विहित नमुन्यात जातीचे प्रमाणपत्र निर्गमित करण्यात येणार आहे.
कॉस्ट्राईबच्या प्रयत्नांना यश : सक्रिय प्रतिसादाबद्दल एसडीओंचे मानले आभार
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा :अनुसूचित जाती, अनुसूचित जनजातीच्या उमेदवारांना केंद्राच्या जातीच्या प्रमाणपत्राच्या सुधारित विहित नमुन्यात जातीचे प्रमाणपत्र निर्गमित करण्यात येणार आहे. यासाठी कास्ट्राईब संघटनेने पुढाकार घेतला होता. मागणीची पुतर्ता झाल्यामुळे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांचे संघटनेनी आभार मानले.
राज्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या उमेदवारांनी भारत सरकारच्या केंद्रीय कार्यालयात, वा राष्ट्रीयकृत बँका इत्यादी ठिकाणी निवड झाल्यानंतर नियुक्ती होण्यापूर्वी त्यांच्याकडून केंद्र सरकारच्या जातीच्या प्रमाणपत्राच्या संशोधित विहित सुधारित नमुन्यात जातीच्या प्रमाणपत्राची सक्ती करण्यात येते. परंतु बऱ्याच जिल्ह्यात वेळोवेळी "अॅमेंडमेंड" झालेल्या सुधारित विहित नमुन्यात जातीचे प्रमाणपत्र संबंधित एसडीओकडून निर्गमित करण्यात न येता जुन्याच नमुन्यात असे जातीचे प्रमाणपत्र निर्गमीत करण्यात येत होते. असे जुन्या नमुन्यातील प्रमाणपत्र संबंधित नियुक्ती अधिकारी स्वीकारीत नसल्यामुळे अनेकांना महद्प्रयासाने मिळालेली नोकरी गमाविण्याची पाळी येत होती. यासंबंधी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाकडे तक्रारी आल्यानंतर संघटनेने प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेवून अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आयोगाचे सदस्य भंडारा दौऱ्यावर आले असताना सर्कीट हाऊसमध्ये त्यांची प्रत्यक्ष भेट घेतली, लेखी निवेदन दिले व अन्याय झालेल्या उमेदवारांची बाब त्यांच्या लक्षात आणून दिली. दरम्यान संघटनेने समाज कल्याण मंत्री, समाज कल्याण सचिव, बार्टीचे संचालक इत्यादींनाही भेटून लेखी निवेदन दिले व पाठपुरावा सुरु ठेवला. विशेषत: अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आयोगाचे सदस्य सी.एल. थुल यांनी या प्रकरणाची दखल घेवून विभागीय आयुक्तांना लेखी विचारणा केली. विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना व जिल्हाधिकाऱ्यांनी एडीओंना विचारणा केल्यामुळे सुधारित नमुन्यात जातीचे प्रमाणपत्र देणे सुरु झाले आहे.
केंद्राच्या जातीच्या प्रमाणपत्राच्या सुधारित विहित नमुन्यात जातीचे प्रमाणपत्र निर्गमित करीत असल्याचे कास्ट्राईब संघटनेला लेखी कळविल्यामुळे, संघटनेने एकाशिष्ट मंडळाद्वारे उपविभागीय अधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांची भेट घेवून त्यांच्या सक्रीय प्रतिसादाबद्दल त्यांचे लेखी धन्यवाद मानले. शासकीय आदिवासी वस्तीगृहातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या बदल्याविषयी सुद्धा चर्चा केली. शिष्टमंडळात महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे राज्य ज्येष्ठ उपाध्यक्ष अमृत बन्सोड, भंडारा जिल्हा अध्यक्ष गुलशन गजभिये, सचिव नरेंद्र बन्सोड, मुख्य संघटन सचिव रुपचंद रामटेके, कार्याध्यक्ष अशोक बन्सोड, ज्येष्ठ उपाध्यक्ष पी.डी. शहारे, कार्यालयीन सचिव आनंद गजभिये, अतिरिक्त सचिव मोरेश्वर गेडाम, संघटन सचिव अर्जुन गोडबोले, करण रामटेके, सल्लागार डी.एफ. कोचे, उपाध्यक्ष आदिनाथ नागदेवे इत्यादींचा समावेश होता.