वैनगंगा नदीत आढळला तरूणीचा मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 12:18 AM2018-01-18T00:18:28+5:302018-01-18T00:19:10+5:30
शिकवणी वर्गासाठी जात असल्याचे सांगून १३ जानेवारीच्या सायंकाळी घराबाहेर पडलेल्या एका २२ वर्षीय तरूणीचा मृतदेह संशयास्पद स्थितीत बुधवारला दुपारी वैनगंगा नदी पात्रातील कारधा पुलाखाली तरंगताना आढळून आला.
आॅनलाईन लोकमत
भंडारा : शिकवणी वर्गासाठी जात असल्याचे सांगून १३ जानेवारीच्या सायंकाळी घराबाहेर पडलेल्या एका २२ वर्षीय तरूणीचा मृतदेह संशयास्पद स्थितीत बुधवारला दुपारी वैनगंगा नदी पात्रातील कारधा पुलाखाली तरंगताना आढळून आला. तिचा खून की आत्महत्या याविषयी चर्चांना पेव फुटले असून या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.
प्रतीक्षा प्रकाश बागडे रा.लाला लजपतरॉय वॉर्ड भंडारा असे मृत तरूणीचे नाव आहे. घटनेच्या दिवशी प्रतीक्षा ही शिकवणी वगार्साठी जात असल्याचे सांगून घरून गेली. परंतु रात्री उशिरापर्यंत ती घरी न परतल्याने कुटुंबियांनी तिच्या मित्र-मैत्रिणींना भेटून चौकशी केली. परंतु तिच्याबाबत कुणीही काहीही सांगितले नाही. त्यामुळे प्रतीक्षाच्या पालकांनी याबाबत १३ जानेवारीला तोंडी तक्रार आणि त्यानंतर १४ जानेवारीला भंडारा पोलिसांकडे लेखी तक्रार नोंदविली.
त्यानंतर रविवारला दुपारच्या सुमारास प्रतीक्षाची दुचाकी वैनगंगा नदीच्या पुलावर असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी दुचाकीचा पंचनामा करून वाहन जमा केले. मात्र प्रतिक्षाचा शोध लागला नव्हता. तपासादरम्यान पोलिसांना प्रतीक्षाचा मोबाईल डॉ.आंबेडकर वॉर्डातील सचिन गजभिये नामक तरूणाकडे आढळला. परंतु सदर मोबाईल प्रतिक्षानेच माझ्याकडे दिल्याचे सचिनने पोलिसांना सांगितले आहे. दरम्यान, बुधवारला दुपारी वैनगंगा नदीच्या पात्रात मृतदेह तरंगताना आढळून आला. ही माहिती होताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर पोलिसांनी डोंग्याच्या सहाय्याने मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढला. त्यावेळी या नागरिकांची एकच गर्दी झाली होती. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रूग्णालयात पाठविला. सायंकाळी उशिरा उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह कुटुंबीयांकडे सोपविण्यात आला. उत्तरीय तपासणीचा अहवाल पुणे, नागपूरला पाठविण्यात येणार आहे. हा अहवाल आल्यानंतरच प्रतिक्षाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे सांगता येईल, असे डॉक्टरांनी सांगितले.
मृतदेहावर होते जखमांचे व्रण
बुधवारला दुपारी प्रतिक्षाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठले. नदी पात्रातून मृतदेह बाहेर काढण्यात आला असता तिच्या डोक्यावर मोठ्या शस्त्राने मारहाण केल्याच्या जखमा दिसून आल्या. तिच्या डोक्यातून रक्तस्त्राव सुरू होता. त्यामुळे मारेकºयांनी तिचा खून करून मृतदेह नदीपात्रात फेकून दिला असावा, अशी चर्चा सुरू आहे. त्यामुळे पोलिसांनी त्यादिशेने तपास करावा अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे.
दोन तरूण ताब्यात
दरम्यान, बागडे कुटुंबीयांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत ज्या दोघांविरूद्ध संशय व्यक्त केला होता. त्या दोन तरूणांना भंडारा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्या दोघांची प्रतीक्षाच्या मृत्यूबाबत चौकशी सुरू आहे. तिने आत्महत्या का केली असावी याचा शोध सुरू आहे.
मुलीच्या वडिलाने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तत्त्परता दाखविली असती तर तिचा शोध लागला असता. या प्रकरणात एका पोलिसाचा मुलगा गुंतलेला असल्यामुळे पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले नाही. आता या प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी करण्यात यावी.
-मनोज बागडे, महासचिव
भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटी.