मासे चोरण्यासाठी चक्क तलावच केला रिकामा, हजारो माशांचा तडफडून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2019 12:40 AM2019-04-25T00:40:50+5:302019-04-26T11:00:23+5:30
मासे चोरण्यासाठी तलावावर दोन इंजिन लावून चक्क तलावच रिकामा करण्याची घटना तालुक्यातील कुशारी येथे घडली. माशांची चोरी करण्यासाठी चोरट्यांनी तलावातील पाणी काढलं त्यामुळे हजारो माशांचा पाण्याअभावी तडफडून मृत्यू झाला आहे.
मोहाडी : मासे चोरण्यासाठी तलावावर दोन इंजिन लावून चक्क तलावच रिकामा करण्याची घटना तालुक्यातील कुशारी येथे घडली. माशांची चोरी करण्यासाठी चोरट्यांनी तलावातील पाणी काढलं त्यामुळे हजारो माशांचा पाण्याअभावी तडफडून मृत्यू झाला आहे. याप्रकरणी मच्छीपालन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी मोहाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
कुशारी येथे जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाचा तलाव आहे. मासे पालनासाठी मोहाडी येथील एका संस्थेने हा तलाव पाच वर्षासाठी लीजवर घेतला आहे. या तलावात एक लाख रुपयांचे मत्स्यबीज टाकण्यात आले होते. या तलावातील मासे मोठे झाले की दुसऱ्या तलावात नेऊन सोडले जातात. परंतु कुशारी येथील चार-पाच तरुणांनी तलावावर दोन इंजिन लावून पाण्याचा उपसा केला. त्यामुळे मासे तडफडून मृत्यूमुखी पडली. संस्थेचे पदाधिकारी या ठिकाणी गेले असता पाणी उपसा करणारे तेथून पळून गेले. या घटनेची तक्रार मोहाडी पोलीस ठाण्यात देण्यात आली. त्यात नारायण साकुरे, विजय समरीत, विलास दिपटे यांची नावे देण्यात आली. पोलीस निरीक्षक शिवाजी कदम यांनी घटनास्थळी जावून दोन इंजिन व बैलगाडी जप्त केली. पाणी टंचाईच्या काळात हा तलाव पूर्णत: कोरडा झाला असून याचा फटका आता पाणीपुरवठ्यावरही होणार असल्याचे दिसत आहे.
भंडारा : माशांची चोरी करण्यासाठी चोरट्यांनी तलावातील पाणी काढलं, हजारो माशांचा पाण्याअभावी तडफडून मृत्यू, कुशारी गावातील घटना, मच्छीमार संघटनेची अज्ञातांविरुद्ध मोहाडी पोलिसात तक्रार #Fish
— Lokmat (@MiLOKMAT) April 26, 2019
नुकसान भरपाईची पत्रकारपरिषदेत मागणी
तलावातील पाण्याचा उपसा केल्याने मासे मृत्यूमुखी पडले यामुळे संस्थेचे मोठे नुकसान झाले. संस्थेला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी एका पत्रकार परिषदेत एकलव्य सेनेचे प्रदेशाध्यक्ष संजय केवट यांनी केली. यावेळी मत्स्यपालन संस्थेचे हरेश मारबते, सहदेव मारबते, सखाराम मारबते, मुन्ना शेंडे, महादेव मारबते, बंडू वलथरे, हरीराम कोल्हे, दिवाळु शेंडे, प्र्रकाश बावणे, सुनील मेश्राम, बाबुराव मारबते, सुनील वलथरे, गंगाराम कोल्हे, तुळशीराम कोल्हे, जयपाल कोल्हे, नामदेव बावणे, लखाराम शेंडे, प्रकाश बावणे, कैलास मारबते, अंकुश कोल्हे, भुमेश्वर वलथरे, मनोहर कोल्हे आदी उपस्थित होते.
अर्ध्या तलावावर अतिक्रमण
कुशारी येथील जिल्हा परिषदेच्या तलावाला एका बाजुने पाळ नाही. तर शेती लागून आहे. शेतकऱ्यांनी मोठा प्रमाणात तलावात अतिक्रमण केले. त्यामुळे तलावाचा आकार निम्मा झाला आहे. संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे. गाळाने तलाव उथळ झाले आहे. पाणी साचून राहत नाही. या तलावाचे मोजमाप करुन झालेले अतिक्रमण हटविण्यात यावे, अशी मागणी होत आहे.
सदर प्रकरणात चौकशी करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे. दोषीवंर निश्चितच कारवाई करण्यात येईल.
- शिवाजी कदम, पोलीस निरीक्षक मोहाडी