‘ड्रोन’च्या माध्यमातून नदीपात्रात चित्रीकरण
By admin | Published: February 13, 2017 12:19 AM2017-02-13T00:19:46+5:302017-02-13T00:19:46+5:30
सैराट मराठी चित्रपटाचे निर्माते नागराज मंजुळे मागील चार दिवसांपासून सुकळी (दे) व मुंढरी दरम्यान वैनगंगा नदी पात्रात मराठी चित्रपटाचे चित्रीकरण करीत आहेत.
ढोरवाड्यातही कलाकारांचा ठिय्या : सैराट निर्माते नागराज मंजुळे यांची उपस्थिती
मोहन भोयर तुमसर
सैराट मराठी चित्रपटाचे निर्माते नागराज मंजुळे मागील चार दिवसांपासून सुकळी (दे) व मुंढरी दरम्यान वैनगंगा नदी पात्रात मराठी चित्रपटाचे चित्रीकरण करीत आहेत. ड्रोणच्या माध्यमातून येथे चित्रीकरण सुरु आहे. या चित्रपटात त्यांची पाटलांची मुख्य भूमिका आहे. शनिवारी दिवसभर नदी पात्रातील पाण्यातून बैलगाडी एका तिरावरुन दुसऱ्या तिरावर काठावर बाहेर काढण्याचे चित्रीकरण करण्यात आले. चित्रीकरणादरम्यान युनिट सदस्याव्यतिरिक्त दुसऱ्यांना तिथे जाण्याची मनाई आहे, हे विशेष.
पूर्व विदर्भातील वैनगंगा ही प्रमुख नदी आहे. सुकळी (दे) व मुंढरी दरम्यान नदीचे पात्र विस्तीर्ण आहे. एका काठावरुन दुसऱ्या काठावर जाण्यास येथे पूल नाही.
दोन गावांचा संपर्क पावसाळ्यात बंद असतो. ऐरवी हिवाळा व उन्हाळ्यात नदी पात्रातून ये-जा सुरु असते. जीव धोक्यात घालून हे येथे सुरु आहे. यासंदर्भात या चित्रपटात येथील दृष्य घेण्यात आले आहे. आतापर्यंत माडगी (दे.) येथील सीबीएससीची एस.एन.एस. शाळेबाहेरील दृष्य चित्रीकरण करण्यात आले. यात एका पाच वर्षीय मुलीला तिचे वडील शाळेत सोडून देत आहेत. दुसरे दृष्य रुग्णालयताील आहे. तुमसर तालुक्यातील ढोरवाडा (दे) येथे चित्रपटाचा सेट (वाडा) तयार केला आहे. या चित्रपटातील अनेक दृष्य वैनगंगा नदी पात्रातील आहेत.
नदी पात्रात चार कोळ्यांच्या झोपड्या तयार केल्या आहेत. त्यात मासेमारीचे जाळे ठेवले आहेत. वाहत्या पाण्यातून बैलबंडीची वाहतूक हे मुख्य दृष्य येथे शनिवारी दिवसभर चित्रीकरण करण्यात आले. या दृष्यात खुद्द नागराज मंजूळे बैलबंडीला ढकलत आहेत. बैलबंडीवर एक वृध्द महिला, पाच ते सहा वर्षाचा एक मूलगा, बैलबंडी हाकणारा एक युवक असे हे दृष्य आहे.
चित्रपटाचे नाव नाळ, आई तथा सैराट २ असल्याची चर्चा आहे. खरे नाव येथे गुपीत ठेवण्यात आले आहे. मुंढरी येथील एका मंदिरात येत्या दोन- तीन दिवसात चित्रीकरण करण्यात येईल असे युनिट सदस्यांनी सांगितले. डिसेंबर अखेर पर्यंत हा चित्रपट प्रदर्शनीत होणार असल्याची माहिती आहे. या चित्रपटात काही स्थानिक कलावंत घेण्यात आले आहे. स्थानिकांना येथे यामुळे रोजगारही प्राप्त झाला आहे. चित्रीकरणादरम्यान कुणालाच जवळ जाण्याची येथे मनाई आहे. युनिटमध्ये किमान ६० ते ७० जणांचा समावेश आहे.
या चित्रपटात नागराज मंजूळे हे पाटलाच्या मुख्य भूमिका साकारीत ओत. पूर्व विदर्भातील बोली भाषा, आर्थिक, सामाजिक स्थिती, समस्या, अडचणी, एकोपा-दुरावा, स्थानिक लोक यांचे मिश्रण या चित्रपटात आहे. तुमसर व मोहाडी तालुक्यातील शेकडो नागरिक चित्रीकरणाला उपस्थिती दर्शवित आहेत.