स्पर्धा परीक्षांना धैर्याने समोरे जा
By admin | Published: November 13, 2016 12:23 AM2016-11-13T00:23:10+5:302016-11-13T00:23:10+5:30
भारतीय प्रशासकीय सेवा तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाासह विविध स्पर्धा परिक्षेत यशस्वी होण्यासाठी ...
शांतनू गोयल : स्पर्धा परीक्षा कार्यशाळा
भंडारा : भारतीय प्रशासकीय सेवा तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाासह विविध स्पर्धा परिक्षेत यशस्वी होण्यासाठी परिश्रमासोबतच धैर्य आणि संयमाची आवश्यकता असून अपयशाने खचून न जाता अंतिम ध्येय प्राप्त होईपर्यंत प्रयत्न करीत राहा, असे प्रतिपादन गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनु गोयल यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा परिक्षा अभ्यासिका मार्गदर्शन केंद्र सामाजिक न्याय भवन येथे स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन कार्यशाळेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी हे होते. यावेळी गडचिरोलीचे आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, उपविभागीय अधिकारी डॉ.संपत खिलारी, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त डी.एन.धारगावे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, स्पर्धा परिक्षा हे जीवनाचे वास्तव असून स्पर्धा परिक्षेचा बाऊ न करता आत्मविश्वासाने समोरे जा असा सल्ला दिला.स्पर्धा परिक्षा केंद्रासाठी आवश्यक ती सर्व मदत प्रशासन करणार असून मुलांनी जिद्दीने यशस्वी व्हावे. दर महिन्यांच्या दुसऱ्या शनिवारी यशस्वी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाची संधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कौस्तुभ दिवेगावकर म्हणाले, केंद्रीय लोकसेवा आयोगाची परिक्षा ही सातत्य आणि संयमाची कसोटी आहे. कुठलाही विषय कायमचा समजून घेण्यासाठी वाचा. त्या विषयाबद्दल स्वत:ला व्यक्त होता येईल असे आकलन करा, संघर्षाची प्रक्रीया एन्जॉय करा असे दिवेगावकर यांनी सांगितले.
उपविभागीय अधिकारी डॉ.संपत खिलारी म्हणाले, स्वत:मधली क्षमता ओळखा व त्यानुसार प्रयत्न करा. ज्या क्षेत्रात अर्ज कराल त्या क्षेत्रातील उंचीची सेवा प्राप्त करण्याची जिद्द मनात ठेवा असे सांगितले. यावेळी तिनही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मुलांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. या कार्यशाळेला विद्यार्थी, विद्यार्थिनी व पालक उपस्थित होते. संचालन प्रमोद गणवीर यांनी केले. (शहर प्रतिनिधी)