पशुपालकांना दिले चारा बनविण्याचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 11:44 PM2018-04-10T23:44:07+5:302018-04-10T23:44:07+5:30
जनावरांना अन्न म्हणून लागणाऱ्या वैरणाची समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. शेतकरी बांधवांना जनावरांच्या चाऱ्यासाठी भटकंती करावी लागत आहे. मात्र पशुसवंर्धन विभाग साकोली व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांच्या या समस्येवर उपाय शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जनावरांना अन्न म्हणून लागणाऱ्या वैरणाची समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. शेतकरी बांधवांना जनावरांच्या चाऱ्यासाठी भटकंती करावी लागत आहे. मात्र पशुसवंर्धन विभाग साकोली व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांच्या या समस्येवर उपाय शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. स्वत:च्या शेतात चारा तयार करण्यासाठी पशुपालकांना शेतीशाळेत वैरण तयार करण्याचे धडे देण्यात येत आहेत.
साकोली तालुक्यातील सोनपूरी येथे पशुपालकांसाठी कार्यशाळा घेण्यात आली. यात प्रत्यक्ष अधिका-यांनी प्रात्यक्षिक करून शेतकऱ्यांना चारा तयार करण्यासाठी स्वावलंबी बनविले आहे.
सोनपुरी येथे शेतीशाळेचे उद्घाटन सरपंच योगिता टेंभुर्णे यांच्या हस्ते पोलीस पाटील पिलोतम्मा कठाणे यांचे अध्यक्षतेखाली पार पडले. यावेळी अतिथी म्हणून उपसरपंच उके, पशुधन विकास अधिकारी डॉ.नरेश कापगते, तालुका कृषी अधिकारी जी.के. चौधरी, आत्माचे तालुका समन्वयक जवंजार उपस्थित होते. शेती शाळेला उपस्थित डॉ. नरेश कापगते, सहायक आयुक्त डॉ.राजीव महाजन, डॉ. अंकिता पोयरेकर, डॉ.भाग्यश्री राठोड, मातोश्री गोशाळेचे संचालक यादोराव कापगते, तालुका कृषी अधिकारी चौधरी आदी तज्ज्ञ मार्गदर्शकांना व तालुक्यातील निवडक पशुपालकांना जनावरांसाठी चारा तयार करण्याबाबत धडे दिले. यात दुग्धव्यवसाय, शेळीपालन, कुक्कुटपालन, विविध चारा पिके व प्रत्यक्ष कृती कार्यक्रमांतर्गत गव्हांडा, तणस यावर युरिया प्रक्रिया, अझोला कल्चर, बहुवार्षिक वैरण- यशवंत जयवंत जातीचे ठोंबे वाटप, मलमुत्र व्यवस्थापन, गांडूळखत निर्मिती आदी विषयावर माहिती देऊन पुशपालकांच्या शंका दूर करण्यात आले. केवळ माहिती नाही तर प्रात्यक्षिक करून चारा तयार करण्याच्या प्रक्रिया सांगण्यात आले. भविष्यात जनावरांच्या चाºयाचे संकट टाळण्यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शकांनी पशुपालकांना दिलेले धडे हे त्यांना कामी येणार आहेत.
समारोपिय कार्यक्रमाला डॉ.सुरेश कुंभारे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.नितीन फुके, डॉ.नरेश कापगते उपस्थित होते. यावेळी डॉ.कुंभारे यांनी शेतकऱ्यांनी शास्त्रोक्त पध्दतीने पशुपक्षी पालनाचा अवलंब शेतीपुरक व्यवसाय म्हणून करावा, असे सांगितले. पशुपक्षी पालन करताना व्यावसायिक दृष्टिकोन बाळगावा, असे आवाहन डॉ.नितीन फुके यांनी केले.