एड्सग्रस्त रुग्णांकडे बघण्याची मानसिकता बदलण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 09:08 PM2017-11-30T21:08:13+5:302017-11-30T21:08:34+5:30
आहार, व्यायाम, व जगण्याच्या आनंदाकडे दुर्लक्ष करणे ही आजाराची प्रमुख लक्षणे आहेत. माणूस आरोग्याकडे गांर्भियाने पहात नाही. नेहमी आरोग्य गृहीत धरल्या जाते. शरीर ही देवाने मानवाला दिलेली देणगी आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : आहार, व्यायाम, व जगण्याच्या आनंदाकडे दुर्लक्ष करणे ही आजाराची प्रमुख लक्षणे आहेत. माणूस आरोग्याकडे गांर्भियाने पहात नाही. नेहमी आरोग्य गृहीत धरल्या जाते. शरीर ही देवाने मानवाला दिलेली देणगी आहे. आजार हे केवळ आरोग्याशी संबंधित असून कुठल्याही रुग्णाचा तिरस्कार न करता त्याला केवळ रुग्ण म्हणून पहावे. आपल्याकडे एड्स या आजाराविषयी अनेक संभ्रम आहेत. एड्सग्रस्त रुग्णाकडे पाहण्याची मानसिकता बदलण्याची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी केले.
सामान्य रुग्णालयाच्या वतीने जागतिक एड्स दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रवीशेखर धकाते, जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनिता बढे, माहिती व विस्तार अधिकारी भगवान मस्के, पत्रकार विजय खंडेरा उपस्थित होते.
या कार्यक्रमात उपस्थितांना जिल्हाधिकारी यांनी एड्स दिनानिमित्त शपथ दिली. सकाळी रुग्णालयाच्या वतीने शहरातून एड्स जनजागृती प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. १९८६ पासून एड्स या विषयावर आपल्या देशात काम सुरु आहे. यात मोठया प्रमाणात यश प्राप्त झाले आहे. तरी सुध्दा आजही एड्स विषयी अनेक संभ्रम आहे. हे संभ्रम दूर होणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. माणूस नेहमी स्वत:च्या आरोग्याचे व मनाचे काळजी घेत नाही. मन व शरीर यांना चांगल्या सवयी लावणे गरजेचे आहे. सकस आहार, नियमित व्यायाम, चांगले वाचन या सवयी केवळ अंगिकारुन चालत नाही तर त्या निरंतर जपाव्या लागतात, असे जिल्हाधिकारी म्हणाले. कंटाळा हा आजाराचे मुळ असल्याचे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले की, चांगले चित्रपट, चांगले मित्र, चांगली पुस्तकं माणसाला नेहमी आनंदी रहायला शिकवतात. प्रत्येक चांगल्या गोष्टीचा आनंद घ्यायला शिकल्यास आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होते. चांगले आरोग्य हा आपला अधिकार असून यासाठी जागृत राहणे काळाची गरज आहे.
एड्स विषयी समाजात जनजागृती करतांना एड्स रुग्णांना माणूस म्हणून मानाचे स्थान मिळवून दिल्यास यापेक्षा मोठा आनंद नाही, असे ते म्हणाले. नेहमी विजयी मानसिकता ठेवा व चांगल्या जगण्याची सवय स्व:ताला लावा म्हणजे आपोआपच निरोगी जीवन प्राप्त होईल, असा सल्ला त्यांनी दिला.
यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक रविशेखर धकाते म्हणाले, नागरिकांनी आरोग्यदूत म्हणून काम करणे गरजेचे आहे. रुग्णाशी माणूसकीचा व्यवहार झाल्यास रुग्णांना आपण समाजाचे घटक आहोत याविषयीची खात्री पटेल. एड्स हा मैत्री करण्याने, हात मिळविल्याने, संसर्गित व्यक्ती सोबत जेवल्याने किंवा त्याची भांडी व कपडी वापरल्याने होत नाही. एड्स हा रक्त, असुरक्षित संबंध, संसर्गित सुईचा वापर व संसर्गित रक्त वापरल्यामुळेच होतो. त्यामुळे समाजाने आपले गैरसमज दूर ठेवून रुग्णांशी मानवतावादी व्यवहार ठेवावा, असे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमात जिल्हाधिकारी यांचे हस्ते जनजागृती साहित्याचे प्रकाशन व समुपदेशन केंद्राचे उदघाटन करण्यात आले. या कार्यक्रमास शालेय विद्यार्थी, अधिकारी व परिचारीका उपस्थित होते.