ग्रामसभेत हाणामारी करणाऱ्या नऊ जणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 10:58 PM2018-08-27T22:58:02+5:302018-08-27T22:58:26+5:30
एका ग्रामपंचायत सदस्याने ग्रामसभेत मत व्यक्त करण्यासाठी हातात माईक घेतला असता, विरोधकांनी त्याच्यावर हल्ला केल्याने आशिष गजभिये नामक मित्र बचाव करण्यासाठी समोर आला. काही लोकांनी त्याला मारहाण करीत जातिवाचक शिवीगाळ केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखांदूर : एका ग्रामपंचायत सदस्याने ग्रामसभेत मत व्यक्त करण्यासाठी हातात माईक घेतला असता, विरोधकांनी त्याच्यावर हल्ला केल्याने आशिष गजभिये नामक मित्र बचाव करण्यासाठी समोर आला. काही लोकांनी त्याला मारहाण करीत जातिवाचक शिवीगाळ केली. आरोपी मोकाटच असल्याने रविवारला येथील टि-पाँईट ते पोलीस ठाण्यावर समाजबांधवांनी शांती मोर्चा काढून निवेदनाद्वारे आरोपींना अटक करण्याची मागणी केली होती. मोर्च्यासमोर अखेर पोलीस प्रशासनास नमावे लागले. सायंकाळी सर्व आरोपींना अटक करण्यात आली.
पिंपळगाव/कोहळी येथे २३ आॅगस्टला झालेल्या ग्रामसभेत विकास कामे व लोकांच्या आर्थिक बांबींच्या निवारणार्थ सभेला सुरवात झाली. त्यात कुसुम जनार्धन भैसारे, विशाल वर्धमान लांडगे, बारसू नेऊ धाकडे याचे घरकूलाच्या लाभाकरीता ठराव पारीत झाले असतांना गावचे उपसरपंच गोपाल परसुरामकर यांनी यावर कोणाचे आक्षेप आहेत का म्हणून सदर प्रकरणाला वाच्यता फोडत जनतेसमोर आणल्याने त्यांच्या काही निकटवतीर्यांनी जास्त संख्याबळ असल्यामुळे घरकूलास पाञ तिन्ही लाभार्थ्याच्या नावास विरोध केला.
त्यावर एका अनुसूचित जातीतील ग्रा.पं. सदस्य निशांत बडोले व अन्य लोकांनी आवाज उठविला असता अल्पसंख्याकांचा फायदा घेत हेमराज परसुरामकर, सतिष निनावे, दिनेश परसुरामकर, सुनिल कापगते, मच्छिंद्र गहाने, तुकाराम बेदरे, उमेश निनावे, विवेक परसुरामकर, सागर निनावे या नऊ लोकांनी हल्ला केल्याने आशिष गजभिये हा युवक पुढे सरसावला. त्याला मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.
लाखांदूर पोलीसांना माहिती देण्यात आली. उपविभागीय पोलिस अधिकारी तिक्कस यांनी घटनेचा तपास करून आरोपींवर कलम १४३, १४७, ३२३ अन्वये गुन्हे दाखल केले आहे.