आता कामचुकार अधिकाऱ्यांची गय नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 11:49 PM2018-04-04T23:49:37+5:302018-04-04T23:49:37+5:30
शासनातर्फे प्रत्येक गावाकरिता विविध सोयी सुविधांसाठी विशिष्ट निधीची तरतूद करण्यात आली आहे. या सोयीसुविधा त्या त्या गावांना वेळेवर मिळाव्यात जेणेकरून त्या गावाचा व गावकऱ्यांचा संपूर्ण विकास होईल, असा शासनाचा उदात्त हेतू असतो.
लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : शासनातर्फे प्रत्येक गावाकरिता विविध सोयी सुविधांसाठी विशिष्ट निधीची तरतूद करण्यात आली आहे. या सोयीसुविधा त्या त्या गावांना वेळेवर मिळाव्यात जेणेकरून त्या गावाचा व गावकऱ्यांचा संपूर्ण विकास होईल, असा शासनाचा उदात्त हेतू असतो. मात्र अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे बऱ्याच शासकीय योजना केवळ कागदावरच असतात. याला फक्त अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा कारणीभूत ठरतो; मात्र आता असे खपवून घेता येणार नाही, असा इशारा जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे यांनी दिला.
पंचायत समिती साकोली अंतर्गत आयोजित नगरपरिषद साकोलीच्या सभागृहात आढावा सभेप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती रेखा वासनिक, जिल्हा परिषद सदस्य होमराज कापगते, मंदा गणविर, दिपक मेंढे, अशोक कापगते, माजी सभापती धनपाल उंदिरवाडे, लालचंद लोथे, महादेव काळसर्पे, पंचायत समिती सदस्य छाया पटले, जयश्री पटले, गटविकास अधिकारी सुनिल तडस उपस्थित होते.
डोंगरे म्हणाले, यावर्षी पाणी समस्येची अडचण भासणार आहे. त्यामुळे प्रत्येकांनी पाण्याचा जपून वापर करणे काळाची गरज ठरली आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतींनी गावात मुबलक सुविधा उपलब्ध करावी. अध्यक्ष डोंगरे यांनी सभेदरम्यान जिल्हाधिकाºयांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून एकाचवेळी ७० ग्रामपंचायतीअंतर्गत ७० बोअरवेल्स मंजूर करून दिल्या. गावातील मजुरांना रोजगार मिळावा, यासाठी गावागावात रोजगार हमीचे कामांना प्राधान्य देण्यात येईल, असे आश्वासन दिले. पंचायत समितीनिहाय विविध विभागाचा आढावा घेऊन उपाययोजना सूचविल्या. संचालन विस्तार अधिकारी आर.व्ही. मेश्राम यांनी तर, आभार प्रदर्शन विस्तार अधिकारी एम.डी. नारनवरे यांनी केले. बैठकिसाठी साठी विस्तार अधिकारी के.डी. टेंभरे यांनी नियोजन केले. या कार्यक्रमाला पंचायत समिती अधिकारी - कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.