पेट्रोलचा उडाला भडका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 12:45 AM2018-01-24T00:45:11+5:302018-01-24T00:45:42+5:30
एक-एक पैसा गोळा करून लाख रूपये जमा झाल्यास आयुष्यात कामी पडतील, असे लहानपणी वडिलधाऱ्यांकडून सांगण्यात येत होते.
प्रशांत देसाई।
आॅनलाईन लोकमत
भंडारा : एक-एक पैसा गोळा करून लाख रूपये जमा झाल्यास आयुष्यात कामी पडतील, असे लहानपणी वडिलधाऱ्यांकडून सांगण्यात येत होते. आता अशाच एक-एक पैशाची वाढ करून सरकार वाहनचालकांना अक्षरश: ‘लूट’त असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. जिवनाचा अविभाज्य घटक झालेल्या पेट्रोलच्या दरात मागील सहा महिन्यात दररोज पाच ते दहा पैशांची वाढ होत आहे. पेट्रोलच्या या दरवाढीने आता भडका उडाला आहे.
काँग्रेसच्या कार्यकाळात वर्षातून किमान दोनदा पेट्रोल व डिझेलच्या दरात दोन ते तीन रुपयांची वाढ व्हायची. त्या तुलनेत सर्वसामान्यांना ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखविणाºया केंद्र सरकारने मागील सहा महिन्यात पेट्रोल व डिझेलच्या दरात नित्याने वाढ करीत आहे. यापूर्वी असा प्रकार कधीही घडला नसल्याची संतप्त प्रतिक्रिया सर्वसामान्यांमध्ये उमटू लागली आहे.
भाजप सरकारच्या कार्यकाळात १६ जून २०१७ ला पेट्रोलचे दर ७६.३४ पैसे होते. हे दर आता ८०.६० पैशांवर पोहचले आहे. या सात महिन्यात पेट्रोलच्या किमतीत पाच पैशापासून दहा पैशापर्यंत दररोज वाढ होत आहे. येत्या काही दिवसात पेट्रोलचे दर शंभरी तर गाठणार नाही ना? अश भीती वाहनचालकांना वाटू लागली आहे. इंडियन आॅईल, भारत पेट्रोलियम, हिंदूस्थान पेट्रोलियमच्या माध्यमातून नागरिकांना वाहनांकरिता पेट्रोल व डिझेलचा पुरवठा करण्यात येत आहे. यासह नव्याने आलेल्या अन्य कंपन्यांच्या पेट्रोलपंपाच्या माध्यमातून पेट्रोलची सुुविधा उपलब्ध आहे.
दररोज पेट्रोल व डिझेलच्या किमतीत वाढ होत असल्याने सर्वसामान्य वाहनधारकांची ही एक प्रकारे लुट असल्याची प्रतिक्रिया नागरिकांमध्ये उमटू लागली आहे.
सकाळी ६ वाजता नवीन दर लागू
यापूर्वी पेट्रोल किंवा डिझेलचे दर वाढल्यास मध्यरात्रीपासून ते लागू होत होते. मात्र आता सकाळी ६ वाजतापासून या दरांची अंमलबजावणी करण्यात येते. यासह येत्या काळात ग्राहकांना पेट्रोलची रसीद अत्याधुनिक मशिनच्या माध्यमातून देण्याची सुविधा पेट्रोलियम मंत्रालयाने केली असली तरी दिवसागणिक वाढणाºया दरामुळे वाहनधारक जेरीस आले आहे.
दिवसभरात लाखो लिटरची विक्री
भंडारा जिल्ह्यात ४६ पेट्रोलपंप आहेत. या पेट्रोलपंपवर महिनाभरात सुमारे ७ लाख लिटर पेट्रोल व सुमारे ३० लाख लिटर डिझेलची विक्री होते. एका जिल्ह्याचा विचार केल्यास या दररोजच्या दरवाढीत लाखो रुपये वाढ होत आहे. याचा सर्वसामान्यांना फटका बसत आहे. त्यामुळे वाहनचालकांमध्ये कमालिचा असंतोष पसरला आहे.
जानेवारी महिन्याच्या १ तारखेला पेट्रोलचे दर ७८.२३ रुपये प्रतीलिटर होते. त्यात आता २.३७ रुपये प्रतीलिटरमागे वाढ झाली असून ८०.६० पैशावर हा दर पोहचला आहे. डिझेलच्या किमतीत तब्बल ७.२१ रुपयांनी वाढ झाली आहे. डिझेल १ जानेवारीला ६२.८० रु. प्रतीलिटर होते. त्यात वाढ होऊन ६६.६६ रुपये भाववाढ झाली आहे.
पेट्रोलचे चढते भाव
मंगळवारला पेट्रोलपंपवर भाव बघितले असता सोमवारच्या तुलनेत त्यात वाढ झाल्याने दिसूून आले. सोमवारला ८०.४५ पैसे पेट्रोलचे दर होते. त्यात एका रात्रीत १५ पैशाची वाढ होऊन तो ८०.६० रुपयांवर पोहचला आहे. एकस्ट्रॉ प्रिमियमच्या पेट्रोलचे दर १५ पैशाने वाढले असून काल ८३.२० रुपये तर आज ८३.३५ रुपयावर पोहचला. डिझेल काल ६६.४६ पैसे प्रती लिटर होता. तो आज ६६.६६ पैशावर पोहचला आहे.